माझ्यासोबत अवैध धंदा का सोडला? म्हणत तरुणावर जीवघेणा हल्ला : चौघांविरुद्ध गुन्हा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : माझ्यासोबत अवैध धंद्याचे काम का करत नाही? या कारणावरून २२ वर्षीय तरुणावर दगड, स्टील रॉड आणि हाताबुक्यांनी जीवघेणा हल्ला केल्याची घटना रविवारी २ ऑगस्ट रात्री रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लैंडा ग्राउंड परिसरात घडली. या प्रकरणी रामनगर पोलिसांनी चौघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता बीएनएस अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
प्राप्त माहितीनुसार, विशाल रत्नाकर भोयर २२ वर्ष रा. नुरी चौक, बगळ खिडकी, चंद्रपूर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ते यापूर्वी नसिब खान उर्फ मालू याच्यासोबत कमिशनवर अवैध धंद्याचे काम करीत होते. मात्र त्याच्यासोबत पटत नसल्याने त्यांनी ते काम सोडले. त्यानंतर माझ्यासोबत अवैध धंद्याचे काम का करत नाही? या कारणावरून नसिब खान उर्फ मालू हा त्यांच्यावर चिडून होता आणि त्यांना वारंवार धमक्या देत होता.
तक्रारीनुसार, २ ऑगस्ट रोजी रात्री सुमारे ९ वाजता तक्रारदार घरी नसताना समीर साबीर शेख हा त्यांच्या घरी जाऊन तुझा भाऊ भेटला तर त्याला मारल्याशिवाय राहणार नाही, अशी धमकी देऊन निघून गेला. त्यानंतर तो वारंवार फोन करून त्रास देत होता. परिसरातील नागरिकांनीही आरोपी तक्रारदाराचा शोध घेत असल्याची माहिती दिली.
तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात जात असताना रात्री साडेनऊच्या सुमारास लैंडा ग्राउंड परिसरात समीर साबीर शेख, बबन साबीर शेख, मौसिम कदीर सय्यद उर्फ वसीम बंगाली आणि नसिब खान उर्फ मालू यांनी विशाल भोयर यांना अडविले. साले, तू बहोत माज गया, हवे में उछल रहा है, तेरी मस्ती उतारता हूँ, असे म्हणत शिवीगाळ करण्यात आली. त्यानंतर मौसिम कदीर सय्यद उर्फ वसीम बंगाली व बबन साबीर शेख यांनी हाताबुक्यांनी मारहाण केली. समीर साबीर शेख याने दगड उचलून त्यांच्या डोक्यावर मारला, तर नसिब खान उर्फ मालू याने स्टील रॉडने डोक्यावर वार केल्याने विशाल भोयर गंभीर जखमी झाले. डोक्यातून रक्तस्राव झाल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.जखमी विशाल भोयर यांनी ११२ या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर रामनगर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांना उपचारासाठी हलविण्यात आले.
या प्रकरणी रामनगर पोलिसांनी नसिब खान उर्फ मालू, समीर साबीर शेख, बबन साबीर शेख आणि मौसिम कदीर सय्यद उर्फ वसीम बंगाली यांच्याविरुद्ध बीएनएस कलम १०९(१), ३(५), ३५१(२) व ३५२ अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास रामनगर पोलीस ठाण्याच्या ठाणेदार प्रभावती एकुरके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हनुमान उगले करीत आहेत.
News - Chandrapur




Petrol Price




