महत्वाच्या बातम्या

 दुधवाहीत दूषित पाण्यामुळे अतिसाराचा उद्रेक : २६ जण बाधित, महिलेचा संशयास्पद मृत्यू


२२ रुग्णांना उपचारानंतर घरी सोडले; चौघांवर ब्रह्मपुरी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : शहरालगतच्या दुधवाही गावात दूषित पाण्यामुळे अतिसाराचा उद्रेक झाला असून गेल्या तीन दिवसांत तब्बल २६ जणांना अतिसाराची लागण झाली आहे. उपचारादरम्यान एका महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मनोरथा बनकर ३९ वर्षे असे मृत महिलेचे नाव असून, त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले आहे.

दुधवाही गावात २५ जुलै रोजी अतिसाराचे पहिले रुग्ण आढळून आले. त्यानंतर अवघ्या तीन ते चार दिवसांत रुग्णसंख्या २६ वर पोहोचल्याने आरोग्य यंत्रणा तातडीने सतर्क झाली. माहिती मिळताच आरोग्य विभागाच्या पथकाने गावात दाखल होऊन बाधितांवर उपचार सुरू केले. उपचारानंतर प्रकृतीत सुधारणा झालेल्या २२ रुग्णांना मंगळवारी २८ रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

सध्या अनुप अरुण सोनवाने १०, समवेल सुधीर शेंडे १५, धोंडू सेगो सोनवाने ७१ आणि राणी सुधीर मेंढे १५ या चौघांवर ब्रह्मपुरी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

दरम्यान, मनोरथा बनकर यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना ब्रह्मपुरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, मंगळवारी २८ उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. तथापि, मनोरथा बनकर या यापूर्वीपासून आजारी होत्या. त्यामुळे त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच स्पष्ट होईल, असे आरोग्य विभागाने नमूद केले आहे.

घटनेची गंभीर दखल घेत आरोग्य विभागाने गावात विशेष प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत. दुधवाहीमध्ये जनजागृती मोहीम, पिण्याच्या पाण्याचे क्लोरिनेशन, घरोगरी आरोग्य तपासणी तसेच आवश्यक औषधोपचार करण्यात येत आहेत. नागरिकांनी उकळून व शुद्ध केलेले पाणी पिण्याचे, स्वच्छतेची काळजी घेण्याचे आणि अतिसाराची लक्षणे दिसून आल्यास तातडीने आरोग्य केंद्राशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मंदोधरा सुखदेवे म्हणाल्या, दुधवाही गावात आरोग्य विभागाकडून जनजागृती, क्लोरिनेशन आणि औषधोपचार सुरू आहेत. सध्या परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. मनोरथा बनकर या यापूर्वीपासून आजारी होत्या. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होईल.





  Print






News - Chandrapur




Related Photos