वाघाच्या हल्ल्यात गुराखी जखमी : चिवंडा परिसरात भीतीचे वातावरण


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / गोंडपिपरी : तालुक्यातील चिवंडा येथे जंगल परिसरात गुरे राखण्यासाठी गेलेल्या गुराख्यावर वाघाने हल्ला करून जखमी केल्याची घटना गुरुवारी, ३० रोजी दुपारी सुमारे ३ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे चिवंडा परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
प्राप्त माहितीनुसार, चिवंडा येथील रहिवासी अशोक भिमा आत्राम हे नेहमीप्रमाणे जंगलालगतच्या भागात गुरे राखत होते. यावेळी अचानक दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर झडप घातली. वाघाच्या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले.
हल्ल्यानंतर अशोक आत्राम यांनी आरडाओरड केल्याने आसपासच्या नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांची चाहूल लागताच वाघाने जंगलाच्या दिशेने धूम ठोकली. त्यानंतर जखमी अवस्थेतील अशोक आत्राम यांना तातडीने उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर येथे दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच वनविभागाने परिसरात पाहणी करून आवश्यक खबरदारीच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. तसेच जंगल परिसरात जाणाऱ्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे. दरम्यान, वन्यप्राण्यांच्या वाढत्या हालचालींमुळे शेतकरी, गुराखी आणि जंगलालगतच्या गावांतील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
News - Chandrapur




Petrol Price




