गोंदियात मातृ-बालआरोग्याची चिंता वाढली : सव्वा वर्षात २५८ बालकांचा मृत्यू

बालमृत्यू रोखण्याचे प्रशासनाचे उद्दिष्ट अपूर्ण; कुपोषण, आरोग्य सुविधांचा अभाव आणि दुर्गम भागातील अडचणी ठरताहेत कारणीभूत
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गोंदिया : आदिवासी आणि नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोंदिया जिल्ह्यात मातृ आणि बालआरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर स्वरूपात समोर आला आहे. आरोग्य विभागाकडून विविध योजना, जनजागृती मोहीम, सुरक्षित प्रसूती, नवजात बालकांची विशेष काळजी तसेच लसीकरण कार्यक्रम राबविले जात असले, तरी बालमृत्यूचे प्रमाण अपेक्षित पातळीवर कमी होत नसल्याचे उपलब्ध आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.
एप्रिल २०२५ ते जून २०२६ या सव्वा वर्षाच्या कालावधीत जिल्ह्यात तब्बल २५८ बालकांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. बालमृत्यू शून्यावर आणण्याचे प्रशासनाचे उद्दिष्ट अद्याप पूर्ण झालेले नसून, कुपोषण आणि आरोग्य सुविधांमधील त्रुटी हे या समस्येचे प्रमुख कारण ठरत आहेत.
सन २०२५ मध्ये जिल्ह्यात २०४ बालमृत्यू, तर सन २०२६ मध्ये एप्रिल ते जून या तीन महिन्यांत ५४ बालमृत्यू झाले आहेत.
दुर्गम भागातील आरोग्य सुविधांचे आव्हान -
दुर्गम आणि आदिवासी भागात आरोग्य सुविधा पोहोचण्यातील अडचणी, वेळेवर उपचार न मिळणे, कुपोषण, गर्भवती महिलांची अपुरी तपासणी, नवजात बालकांच्या निगेतील त्रुटी आणि आरोग्यविषयक जनजागृतीचा अभाव ही बालमृत्यूची प्रमुख कारणे असल्याचे आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे.
ग्रामीण आणि दुर्गम भागात वैद्यकीय मनुष्यबळाची कमतरता, तज्ज्ञ डॉक्टरांचा अभाव आणि आरोग्य केंद्रांपर्यंत पोहोचण्यातील अडथळे कायम असल्याने गंभीर परिस्थिती निर्माण होत आहे.
गोंदिया आणि आमगाव तालुक्यात सर्वाधिक बालमृत्यू -
तालुकानिहाय आकडेवारीनुसार सन २०२५ मध्ये गोंदिया तालुक्यात सर्वाधिक ६० बालमृत्यू झाले आहेत. त्यापाठोपाठ आमगाव तालुक्यात २८, तर तिरोडा तालुक्यात २७ बालमृत्यू झाले आहेत.
सन २०२५ मधील तालुकानिहाय बालमृत्यू -
तालुका बालमृत्यू
-------------- --------
गोंदिया ६०
आमगाव २८
तिरोडा २७
सडक-अर्जुनी २४
सालेकसा २४
गोरेगाव १६
देवरी १४
अर्जुनी-मोरगाव ११
एकूण २०४
सन २०२६ मध्ये जूनअखेरपर्यंत जिल्ह्यात ५४ बालमृत्यू झाले आहेत. यामध्ये गोंदिया आणि आमगाव तालुक्यात प्रत्येकी ११ बालमृत्यू झाले आहेत.
सन २०२६ मधील तालुकानिहाय बालमृत्यू -
तालुका बालमृत्यू
-------------- --------
गोंदिया ११
आमगाव ११
देवरी ८
सालेकसा ६
तिरोडा ५
गोरेगाव ५
सडक-अर्जुनी ४
अर्जुनी-मोरगाव ४
एकूण ५४
सव्वा वर्षात सहा मातामृत्यू -
बालमृत्यूबरोबरच जिल्ह्यात मातामृत्यूंची समस्याही कायम आहे. एप्रिल २०२५ ते जून २०२६ या कालावधीत जिल्ह्यात सहा मातामृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.
सन २०२५ मध्ये -
गोंदिया तालुका २ मातामृत्यू
देवरी तालुका १
सडक-अर्जुनी तालुका १
सन २०२६ मध्ये
गोंदिया तालुका १
देवरी तालुका १
अशा प्रकारे सव्वा वर्षात एकूण सहा मातामृत्यू झाले आहेत. सुरक्षित प्रसूती आणि उच्च जोखमीच्या महिलांवर लक्ष आवश्यक मातामृत्यू रोखण्यासाठी सुरक्षित प्रसूती, वेळेवर वैद्यकीय उपचार आणि उच्च जोखमीच्या गर्भवती महिलांवर विशेष लक्ष देण्याची गरज तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
आरोग्य विभागाकडून उच्च जोखमीच्या गर्भवती महिलांची नोंदणी, नियमित तपासण्या, संस्थात्मक प्रसूती, विशेष नवजात अतिदक्षता विभाग, पोषण अभियान आणि आशासेविकांमार्फत जनजागृतीचे काम सुरू आहे. मात्र, दुर्गम भागातील अडचणींमुळे अपेक्षित परिणाम साध्य करण्यात मर्यादा येत आहेत.
सर्व विभागांच्या समन्वयातूनच उपाय शक्य -
बालमृत्यू आणि मातामृत्यू कमी करण्यासाठी केवळ आरोग्य विभागावर अवलंबून न राहता महिला व बालविकास विभाग, ग्रामपंचायती, स्थानिक स्वराज्य संस्था आणि लोकप्रतिनिधींनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज आहे.
कुपोषण निर्मूलन, गर्भवती महिलांची वेळेवर आरोग्य तपासणी, नवजात बालकांची नियमित तपासणी आणि दुर्गम भागातील आरोग्य सेवा अधिक सक्षम करणे या बाबींवर विशेष भर देणे आवश्यक आहे.
गोंदिया जिल्ह्यातील मातृ-बालआरोग्याचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे असून, प्रभावी नियोजन, सातत्यपूर्ण देखरेख आणि तळागाळापर्यंत सक्षम आरोग्य सुविधा पोहोचविणे ही काळाची गरज बनली आहे.
News - Gondia




Petrol Price




