गहूबोडी–जामगिरी परिसरातील कथित जमीन व्यवहारांवरून शेतकऱ्यांचा तीव्र संताप : कंपनी व दलालांवर कारवाईची मागणी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील गहूबोडी–जामगिरी परिसरात आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनींच्या कथित अधिग्रहणावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. खासगी कंपनी आणि काही दलालांकडून शासनाची कोणतीही अधिकृत अधिसूचना नसताना जमिनी हडपण्याचे षडयंत्र रचले जात असल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष विश्वजित मारोत्रव कोवासे यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देत हैदराबादस्थित हरी ओम पाईप इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीवर कठोर कारवाई करून संबंधित दलालांना शिक्षा देण्याची मागणी केली आहे.
सुमारे १०० एकर जमिनीचे करार झाल्याचा आरोप -
शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शासनाचा कोणताही अधिकृत आदेश किंवा अधिसूचना नसताना जमीन अधिग्रहण या नावाखाली व्यवहार सुरू करण्यात आले आहेत. अनेक शेतकऱ्यांकडून आगाऊ रक्कम देऊन करारनामे करून घेतले असून आतापर्यंत सुमारे १०० एकरांहून अधिक जमीन अशा प्रकारे करारबद्ध झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. हे सर्व करार तात्काळ रद्द करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
गावकऱ्यांचा विरोध; ग्रामसभेत ठराव -
मारोडा ग्रामपंचायत अंतर्गत गहूबोडी गावात सरपंचांनी ग्रामस्थांना विश्वासात न घेता कंपनीसाठी ना हरकत प्रमाणपत्र दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या प्रकारानंतर गावात विशेष ग्रामसभा घेण्यात आली असून, गावातील कोणत्याही जमिनीच्या अधिग्रहणास मंजुरी न देण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.
दलालांवर गंभीर आरोप -
शासनाची परवानगी असल्याचे खोटे सांगून वारसदार आणि कुटुंबीयांमध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न काही दलालांकडून होत असल्याचा आरोपही शेतकऱ्यांनी केला आहे. आदिवासींच्या अज्ञानाचा आणि माहितीअभावी परिस्थितीचा गैरफायदा घेत जमिनी हडपण्याचा प्रयत्न होत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
चौकशी आणि कारवाईची मागणी -
या संपूर्ण प्रकरणाची तातडीने चौकशी करून सर्व करारनामे रद्द करावेत तसेच दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी ठाम मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. आदिवासींच्या जमिनींचे संरक्षण करण्यासाठी प्रशासनाने तत्काळ हस्तक्षेप करावा, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
या निवेदनावेळी रुपेश टिकले, रजनीकांत मोटघरे, निकेश गड्डेवार यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या आरोपांमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासन आता या प्रकरणात काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
News - Gadchiroli




Petrol Price




