अतिवृष्टीने फुटला बिजापूरचा मामा तलाव : सिंचन व मत्स्य व्यवसायावर मोठे संकट


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / कुरखेडा : मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक जलप्रकल्पांवर ताण निर्माण झाला असून, गुरुवारी दुपारी सुमारे १२ वाजेच्या सुमारास खेडेगाव ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या बिजापूर येथील जुना मामा तलाव दोन ठिकाणी फुटल्याची घटना घडली.
तलावाची पार फुटल्याने तलावातील संपूर्ण पाणी काही वेळातच बाहेर वाहून गेले. या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांचे सिंचनाचे मोठे नुकसान झाले असून स्थानिक मत्स्य व्यवसायालाही मोठा फटका बसला आहे.
सतत सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे तलावाच्या पारावर प्रचंड पाण्याचा दबाव निर्माण झाला होता. हा दबाव सहन न झाल्याने पार दोन ठिकाणी फुटली आणि मोठ्या वेगाने पाणी बाहेर पडले. काही वेळातच तलाव रिकामा झाल्याने परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले.
या तलावावर परिसरातील अनेक शेतकऱ्यांचे सिंचन अवलंबून होते. तलावातील पाणी वाहून गेल्याने आगामी हंगामात पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याशिवाय तलावात मत्स्यपालन करणाऱ्या मच्छीमारांचेही मोठे आर्थिक नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, या घटनेनंतर जिल्हा परिषद सिंचाई विभागाच्या देखभाल व दुरुस्तीच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. तलावाची नियमित तपासणी, दुरुस्ती आणि मजबुतीकरणाची कामे वेळेत झाली असती, तर ही दुर्घटना टाळता आली असती का, असा प्रश्न स्थानिक नागरिक आणि शेतकरी उपस्थित करत आहेत.
या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. प्रशासनाने पंचनामा करून नुकसानीचा आढावा घ्यावा तसेच तलावाच्या पुनर्बांधणीसाठी तातडीने निधी उपलब्ध करून शेतकरी व मत्स्य व्यावसायिकांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
विशेष म्हणजे, याच तलावाच्या देखभाल व सुरक्षिततेबाबत यापूर्वीही अनेकदा प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. मात्र, आवश्यक उपाययोजना वेळेत न झाल्याने अखेर अतिवृष्टीच्या तडाख्यात तलावाची पार फुटून मोठे नुकसान झाल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.
News - Gadchiroli




Petrol Price




