महत्वाच्या बातम्या

 रेल्वे रुळांवर वन्यजीवांचा संहार सुरूच : अस्वलीचा मृत्यू, व्याघ्र दिनाच्या पूर्वसंध्येला वाघाचा बचाव


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : बल्लारशाह –गोंदिया रेल्वेमार्गावरील चंद्रपूर प्रादेशिक वनपरिक्षेत्रातील अष्टभुजा रमाबाई नगरजवळील कक्ष क्रमांक ४०७ परिसरात मंगळवार, २८ जुलै रोजी वन्यजीव संवर्धनाच्या दृष्टीने दोन परस्परविरोधी घटना घडल्या. पहाटे रेल्वेच्या धडकेत एका अस्वलीचा मृत्यू झाला, तर त्याच दिवशी दुपारी लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे रेल्वे रुळ ओलांडणाऱ्या वाघाचा जीव थोडक्यात बचावला. विशेष म्हणजे, जागतिक व्याघ्र दिनाच्या अवघ्या एक दिवस आधी घडलेल्या या घटनेमुळे वन्यजीव संरक्षणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

चंद्रपूर प्रादेशिक वनपरिक्षेत्र अधिकारी नायगमकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ जुलै रोजी पहाटे सुमारे ४ वाजताच्या सुमारास चांदा फोर्टच्या दिशेने येणाऱ्या रेल्वेची एका अस्वलीला जोरदार धडक बसली. या अपघातात अस्वलीचा जागीच मृत्यू झाला. बल्लारशाह–गोंदिया रेल्वेमार्गावर रेल्वे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या अस्वलांची संख्या आता १४ वर पोहोचली असून, वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे वन्यजीवप्रेमी आणि पर्यावरण अभ्यासकांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे.

याच दिवशी दुपारी सुमारे १ वाजण्याच्या सुमारास चांदा फोर्टच्या दिशेने येणाऱ्या रेल्वेच्या लोको पायलटला रेल्वे रुळ ओलांडणारा वाघ दिसला. त्यांनी तत्काळ सतर्कता दाखवत सलग हॉर्न वाजविला आणि आपत्कालीन ब्रेक लावून रेल्वे थांबविली. त्यामुळे वाघ सुरक्षितपणे जंगलाच्या दिशेने निघून गेला. वाघ सुरक्षित अंतरावर गेल्यानंतरच रेल्वे पुढे सोडण्यात आली. लोको पायलटच्या तत्परतेमुळे एका दुर्मिळ वन्यजीवाचा जीव वाचल्याने या घटनेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

हॅबिटॅट कंझर्व्हेशन सोसायटीचे अध्यक्ष दिनेश खाटे यांनी सांगितले की, बल्लारशाह–गोंदिया रेल्वेमार्गावर आतापर्यंत सुमारे १३० वन्यजीवांचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला आहे. हा संपूर्ण पट्टा अत्यंत संवेदनशील वन्यजीव भ्रमणमार्ग असून तेलंगणा, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या राज्यांना जोडणाऱ्या या मार्गावर वाघ, अस्वल आणि इतर वन्यप्राण्यांची नियमित वर्दळ असते.

त्यामुळे या मार्गावर तातडीने प्रभावी उपशमन उपाययोजना, वन्यजीवांसाठी सुरक्षित मार्ग तसेच रेल्वेचा वेग नियंत्रित करण्यासारखे उपाय राबविण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. आणखी किती वन्यजीवांचे बळी गेल्यानंतर प्रशासन या गंभीर प्रश्नाकडे लक्ष देणार, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

घटनास्थळी हॅबिटॅट कंझर्व्हेशन सोसायटीचे अध्यक्ष दिनेश खाटे, रणजित मडावी, अनिकेत वनकर, गणेश मेश्राम, चंद्रपूर प्रादेशिक वनपरिक्षेत्राचे किटे, वनविकास महामंडळाचे मेश्राम तसेच वनपाल कांबळे यांनी पाहणी केली.

दरम्यान, २९ जुलै रोजी साजऱ्या होणाऱ्या जागतिक व्याघ्र दिनाच्या अवघ्या एक दिवस आधी लोको पायलटच्या सतर्कतेमुळे वाघाचा जीव वाचल्याची घटना वन्यजीव संवर्धनाच्या दृष्टीने दिलासादायक ठरली असली, तरी त्याच रेल्वेमार्गावर अस्वलीचा मृत्यू झाल्याने रेल्वेमार्गावरील वन्यजीव सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos