ढोऱ्या-पोऱ्या नाल्यात बुडून नागपूरच्या १७ वर्षीय तरुणाचा मृत्यू

- मित्रांसोबत फिरायला आला होता आडका शिवारात; पोहण्याचा मोह ठरला जीवघेणा
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : मित्रांसोबत फिरण्यासाठी आडका ता. कामठी शिवारात आलेल्या नागपूर येथील एका १७ वर्षीय तरुणाचा ढोऱ्या-पोऱ्या नाल्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी २५ दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली. प्रियांशू मनोज गुरवे १७ वर्ष रा. हिवरीनगर, नागपूर असे मृत तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आषाढी एकादशीनिमित्त शाळेला सुटी असल्याने प्रियांशू गुरवे हा आपल्या काही मित्रांसोबत आडका शिवारात फिरण्यासाठी आला होता. फिरत असताना सर्व मित्र मौजमस्ती करीत दुपारच्या सुमारास ढोऱ्या-पोऱ्या नाल्याच्या काठावर पोहोचले.
नाल्यात मोठ्या प्रमाणात पाणी असल्याचे पाहून मित्रांना पोहण्याचा मोह झाला. यावेळी काही मित्र पोहण्यासाठी नाल्यात उतरले. प्रियांशूही पोहण्यासाठी पाण्यात उतरला. मात्र, पोहत असताना तो अचानक खोल पाण्यात गेला आणि गटांगळ्या खाऊ लागला.
प्रियांशू बुडत असल्याचे लक्षात येताच त्याच्या मित्रांनी आरडाओरड करून मदतीसाठी प्रयत्न केले. मात्र, त्याला वाचविण्यात यश आले नाही. घटनेची माहिती मिळताच आडका गावचे सरपंच विजय खोडके, पोलीस पाटील अनिकेत ढवळे तसेच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली.
ग्रामस्थांनी कोळी बांधवांच्या मदतीने नाल्यात शोधमोहीम सुरू केली. काही वेळात वडोदा ता. कामठी पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. कोळी बांधवांनी अथक प्रयत्न करून प्रियांशूचा मृतदेह नाल्यातून बाहेर काढला.
News - Nagpur




Petrol Price




