शेतकरी कर्जमुक्ती योजना : भंडारा जिल्ह्यात २२,३६५ पात्र लाभार्थ्यांची यादी प्राप्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : महाराष्ट्र शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या दि.२ जून २०२६ च्या शासन निर्णयानुसार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना, २०२६ राज्यात लागू करण्यात आली आहे.
या योजनेअंतर्गत भंडारा जिल्ह्यातील३०,५४९ कर्जखात्यांची माहिती महाआयटीमार्फत विकसित करण्यात आलेल्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली होती. संगणकीय पडताळणीनंतर २२,३६५ पात्र शेतकरी लाभार्थ्यांची यादी प्राप्त झाली आहे
पात्र लाभार्थ्यांना आधार प्रमाणीकरणाबाबत मोबाईलवर एसएमएसद्वारे सूचना पाठविण्यात येणार असून, लाभार्थ्यांच्या याद्या ग्रामपंचायत, विविध कार्यकारी सहकारी संस्था तसेच संबंधित बँकेच्या शाखांमध्ये प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.
यादीतील प्रत्येक पात्र शेतकऱ्यास एक विशिष्ट क्रमांक देण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी आधार क्रमांक किंवा या विशिष्ट क्रमांकाच्या आधारे आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक आहे. भंडारा जिल्ह्यातील सर्व कार्यरत आपले सरकार सेवा केंद्रांमध्ये ही सुविधा उपलब्ध आहे.
आधार प्रमाणीकरण करण्यापूर्वी शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक (Agristack) वर नोंदणी करणे आवश्यक आहे. आधार प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतर पात्र लाभार्थ्यांच्या कर्जखात्यावर कर्जमाफीची रक्कम डीबीटी (DBT) द्वारे जमा करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकरी लाभार्थ्यांनी जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन लवकरात लवकर आधार प्रमाणीकरण करून घ्यावे, असे आवाहन विलास देशपांडे, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, भंडारा यांनी केले आहे. आधार प्रमाणीकरण पूर्ण केल्यानंतरच पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ मिळणार आहे.
News - Bhandara




Petrol Price




