महत्वाच्या बातम्या

 बेरोजगार तरुणांसाठी ठोस धोरणाची गरज : आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या मागणीला सरकारचा सकारात्मक प्रतिसाद


- मुद्रा-स्टँडअप योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महिनाभरात समिती; चंद्रपूर आयटीआयबाबतही तातडीने बैठक होणार

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई : राज्यातील वाढत्या बेरोजगारीच्या प्रश्नावर व्यापक आणि दीर्घकालीन उपाययोजना करण्याची गरज अधोरेखित करत आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत महाराष्ट्र बेकारी निर्मूलन विधेयक, २०२५ या अशासकीय विधेयकावरील चर्चेत सरकारकडे विविध महत्त्वपूर्ण मागण्या मांडल्या.

त्यांच्या सूचनांची दखल घेत कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मुद्रा व स्टँड-अप योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी एका महिन्याच्या आत विशेष समिती स्थापन करण्यात येईल आणि त्या समितीवर आ. मुनगंटीवार यांचा समावेश करण्यात येईल, अशी घोषणा सभागृहात केली.

विधेयकावरील चर्चेदरम्यान आ. मुनगंटीवार यांनी राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालाचा संदर्भ देत महाराष्ट्रात सुमारे ७३ लाख ७४ हजार नोंदणीकृत बेरोजगार असल्याची बाब सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. वाढत्या बेरोजगारीचा प्रश्न केवळ अल्पकालीन उपायांनी सुटणार नसून, त्यासाठी रोजगारनिर्मितीला चालना देणारे सर्वसमावेशक आणि दीर्घकालीन धोरण तयार करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

युवकांना कौशल्य प्रशिक्षणासोबत स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, विविध रोजगार योजनांसाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देणे आणि शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले. विशेषतः मुद्रा, स्टँड-अप आणि स्टार्ट-अप योजनांअंतर्गत बँकांच्या कर्ज योजनांचा लाभ पात्र तरुणांपर्यंत सहज आणि पारदर्शक पद्धतीने पोहोचावा, यासाठी स्वतंत्र धोरणात्मक समिती स्थापन करण्याची मागणी त्यांनी केली.

याशिवाय, सिकॉम आणि महाराष्ट्र स्टेट फायनान्स कॉर्पोरेशन या संस्थांना पुनर्जीवित करून बंद पडलेल्या एमआयडीसीतील उद्योगांना पुन्हा सुरू करण्यासाठी विशेष योजना राबविण्याची सूचनाही त्यांनी केली. त्यामुळे उद्योगांना चालना मिळण्याबरोबरच मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होऊ शकते, असे त्यांनी सांगितले.

चंद्रपूर येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला (आयटीआय) अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज करण्यासाठी सुमारे १०० कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार असून, त्यासाठी आवश्यक निधी मंजूर करण्याची मागणीही आ. मुनगंटीवार यांनी केली.

यावर उत्तर देताना कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आ. मुनगंटीवार यांनी मांडलेल्या सूचना विधायक व सकारात्मक असल्याचे सांगितले. मुद्रा आणि स्टँड-अप योजनांचा लाभ अधिकाधिक पात्र युवकांपर्यंत पोहोचविण्यासाठी एका महिन्याच्या आत समिती स्थापन करण्यात येईल आणि त्यात आ. मुनगंटीवार यांचा समावेश असेल, असे त्यांनी जाहीर केले.

तसेच, सिकॉमच्या माध्यमातून बंद पडलेल्या उद्योगांना पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी विशेष प्रस्ताव मुख्यमंत्रीांकडे सादर करण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी दिले. चंद्रपूर आयटीआयच्या आधुनिकीकरणासंदर्भातील प्रस्तावावर तातडीने बैठक घेऊन पुढील कार्यवाही करण्यात येईल, असेही मंत्री लोढा यांनी सभागृहात स्पष्ट केले.

राज्यातील बेरोजगारीच्या प्रश्नावर झालेल्या या चर्चेमुळे कौशल्य विकास, स्वयंरोजगार आणि उद्योग पुनरुज्जीवनाच्या माध्यमातून रोजगारनिर्मितीला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.





  Print






News - Rajy




Related Photos