मध्य प्रदेशातील फोर्टिफाइड तांदूळ घोटाळ्याचे गोंदियापर्यंत धागेदोरे : दोन राइस मिल मालक एसआयटीच्या ताब्यात


- १२ कोटींचा तांदूळ जप्त; २० हून अधिक ट्रक जप्त, आणखी अनेकांवर कारवाईचे संकेत
विदर्भ न्यूज एक्सरेस
प्रतिनिधी / गोंदिया : मध्य प्रदेशातील बहुचर्चित फोर्टिफाइड तांदूळ घोटाळ्याची व्याप्ती आता महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्यापर्यंत पोहोचली आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) सोमवारी २० गोंदिया येथील दोन राइस मिल मालकांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. एफसीआयच्या गोदामातून एशियन प्लांटच्या नावावर उचलण्यात आलेल्या सरकारी फोर्टिफाइड तांदळाची खरेदी करून त्याच्या अवैध व्यापारात सहभाग असल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या कारवाईनंतर या प्रकरणातील ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची संख्या दहावर पोहोचली असून, गोंदिया जिल्ह्यातील आणखी काही राइस मिल मालकांची चौकशी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
यापूर्वी मध्य प्रदेश पोलिसांनी या घोटाळ्याप्रकरणी आठ राइस मिल मालक व दलालांना अटक केली होती. त्यानंतर गोंदियातील दोन राइस मिल मालकांना ताब्यात घेतल्याने तपासाची व्याप्ती आणखी वाढली आहे. या घोटाळ्यातील मुख्य आरोपी असलेला एशियन प्लांटचा संचालक, शिवनी येथील काही राइस मिल चालक, ट्रान्स्पोर्टर आणि इतर संबंधित व्यक्ती अद्याप फरार असून, त्यांच्या शोधासाठी एसआयटीकडून विविध ठिकाणी कारवाई सुरू आहे. फरार आरोपींना लवकरच अटक केली जाईल, असा दावा तपास यंत्रणांनी केला आहे.
सरकारी तांदळाची खुल्या बाजारात विक्री -
तपासादरम्यान धक्कादायक बाब समोर आली आहे. एफसीआयच्या गोदामातून एशियन प्लांटच्या नावावर फोर्टिफाइड तांदळाची मोठ्या प्रमाणात उचल करण्यात आली होती. मात्र हा तांदूळ नियोजित ठिकाणी पोहोचविण्याऐवजी विविध राइस मिलमध्ये उतरवून दलालांच्या माध्यमातून खुल्या बाजारात अवैधरित्या विकण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे.
मध्य प्रदेश सरकार सार्वजनिक वितरण व्यवस्थेसाठी या फोर्टिफाइड तांदळावर अनुदान देते. सरकारी दरानुसार या तांदळाची किंमत प्रतिक्विंटल २ हजार २०० रुपये आहे. मात्र काही राइस मिल मालकांनी हा तांदूळ दलालांच्या माध्यमातून सुमारे ५ हजार रुपये प्रतिक्विंटल दराने विकल्याची माहिती तपासातून पुढे आली आहे. सरकारी अनुदानित तांदूळ असल्याने त्याची खुल्या बाजारात विक्री करण्यास मनाई असतानाही कोट्यवधी रुपयांचा हा गैरव्यवहार करण्यात आल्याचा आरोप आहे.
५ हजार मेट्रिक टन तांदूळ जप्त; १२ कोटींचा मुद्देमाल हस्तगत -
एसआयटीच्या माहितीनुसार, या प्रकरणात आतापर्यंत ५ हजार मेट्रिक टनांपेक्षा अधिक फोर्टिफाइड तांदूळ जप्त करण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेल्या तांदळाची अंदाजित किंमत १२ कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय एशियन प्लांटच्या नावावर रवाना करण्यात आलेला तांदूळ विविध राइस मिलपर्यंत पोहोचविणाऱ्या २० हून अधिक ट्रकही मध्य प्रदेश पोलिसांनी जप्त केले आहेत.
ट्रकचालकांच्या चौकशीतून उघड झाले रॅकेट -
या घोटाळ्याचा पर्दाफाश करण्यात ट्रकचालकांच्या चौकशीची महत्त्वाची भूमिका ठरली. तांदळाची वाहतूक करणाऱ्या ट्रकचालकांना ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर हा सरकारी तांदूळ नेमका कोणत्या राइस मिलमध्ये उतरविण्यात आला आणि पुढे कुठे विक्री करण्यात आली, याची महत्त्वपूर्ण माहिती तपास यंत्रणेला मिळाली. या माहितीच्या आधारे मध्य प्रदेश पोलिसांनी अटकसत्र सुरू केले असून, या संपूर्ण रॅकेटमधील मोठ्या मास्यांपर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न वेगाने सुरू आहेत.
आणखी मोठ्या कारवाईचे संकेत -
सरकारी अनुदानित फोर्टिफाइड तांदळाचा कोट्यवधी रुपयांचा साठा खुल्या बाजारात विक्रीसाठी वळविणाऱ्या या नेटवर्कचा तपास सध्या निर्णायक टप्प्यात आहे. तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतसे नव्या व्यक्तींची नावे समोर येत असून, येत्या काही दिवसांत आणखी अनेक राइस मिल मालक, दलाल, ट्रान्स्पोर्टर आणि संबंधितांवर कारवाई होण्याची शक्यता तपास यंत्रणांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे या घोटाळ्यातील आणखी मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
News - Gondia




Petrol Price




