कोळसा खाणीतून चोरी गेलेली ॲल्युमिनियम तार जप्त तिघांना अटक : राजुरा पोलिसांची कारवाई


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / राजुरा : पवनी-२ कोळसा खाणीतून चोरीस गेलेली सुमारे एक लाख रुपयांची ॲल्युमिनियम तार अवघ्या काही दिवसांत शोधून काढत राजुरा पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने तिघा आरोपींना अटक केली. या कारवाईत चोरीचा मुद्देमाल तसेच चोरीसाठी वापरण्यात आलेले वाहन असा एकूण ३१ लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला.
प्राप्त माहितीनुसार, धोपटाळा कॉलनी येथील रहिवासी व पवनी-२ कोळसा खाणीत सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत असलेले श्रीनिवास मदनय्या चिंताला ५८ वर्ष यांनी ८ जुलै २०२६ रोजी राजुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. ६ जुलै रोजी दुपारी टी-पाईट परिसरात गस्त घालत असताना तेथे ठेवण्यात आलेली सुमारे दोन हजार फूट लांबीची, चार एमएस जाडीची ॲल्युमिनियम तार गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही तार मिळून न आल्याने अज्ञात व्यक्तीने सुमारे एक लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची तक्रार देण्यात आली.
या तक्रारीवरून राजुरा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ६०२/२०२६, कलम ३०३(२) भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरू करण्यात आला.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथकाने तपासाची सूत्रे हाती घेतली. तपासादरम्यान गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून सुरज शालिक क्षिरसागर रा. बाबापूर, सध्या साखरी, प्रितम सुरेश बेसुरवार रा. साखरी आणि निखील विठोबा मुक्के रा. चार्ली, ता. राजुरा या तिघांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी चोरीची कबुली दिल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.
आरोपींकडून चोरीस गेलेली चार बंडल ॲल्युमिनियम तार किंमत सुमारे एक लाख रुपये, तसेच चोरीचा माल वाहून नेण्यासाठी वापरण्यात आलेले टाटा आयशर वाहन क्र. एमएच-३५ एजे-४३१३ किंमत सुमारे ३० लाख रुपये, असा एकूण ३१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर यांच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण लोकरे यांच्यासह गुन्हे शोध पथकातील सफौ किशोर तुमराम, पोहवा विक्की निर्वाण, अनुप डांगे, पोअं शफीक शेख, महेश बोलगोडवार, मिलिंद जांभुळे, रमेश बस्सी यांनी केले.
News - Chandrapur




Petrol Price




