महत्वाच्या बातम्या

 HSRP नंबर प्लेट नसलेल्या १०९ वाहनांवर कारवाई : RTO व वाहतूक विभागाची संयुक्त तपासणी मोहीम सुरू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : वाहनांवर हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) बसविणे अनिवार्य करण्यात आल्यानंतर गडचिरोली येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO) व वाहतूक (ट्रॅफिक) विभागाने संयुक्तपणे विशेष तपासणी मोहीम हाती घेतली असून, HSRP नसलेल्या वाहनांवर नियमानुसार कारवाई करण्यात येत आहे. १ जुलै २०२७ पासून सुरू झालेल्या या मोहिमेत आतापर्यंत १०९ वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे तसेच सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी अशोक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम सातत्याने राबविण्यात येत आहे. शहरातील विविध चौक व प्रमुख मार्गांवर वाहनांची तपासणी करण्यात येत असून, HSRP नंबर प्लेट नसलेल्या वाहनांवर मोटार वाहन कायद्यानुसार दंड आकारण्यात येत आहे.

या मोहिमेदरम्यान केवळ दंडात्मक कारवाई न करता वाहनचालकांना रस्ता सुरक्षा नियमांचे पालन करण्याबाबत तसेच HSRP नंबर प्लेटचे महत्त्व समजावून सांगत जनजागृतीही करण्यात येत आहे. HSRP नंबर प्लेटमुळे वाहनांची ओळख सुरक्षित व अचूक राहते, बनावट नंबर प्लेटचा वापर रोखण्यास मदत होते तसेच वाहन चोरीसारख्या गुन्ह्यांचा तपास सुलभ होतो, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

या संयुक्त मोहिमेत वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) मेश्राम व त्यांच्या पथकाचे मोलाचे सहकार्य लाभत आहे. तसेच परिवहन विभागाकडून मोटार वाहन निरीक्षक नवनाथ जगदाळे, कमलेश खाडे, स्वप्निल वानखेडे, भागवत चोपडे तसेच सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक धोंडीबा ढगे, देवेंद्र पाटील आणि ओमप्रकाश मेश्राम यांनी कारवाईत सक्रिय सहभाग घेतला.

गडचिरोली जिल्ह्यात अधिकृत केंद्रांच्या माध्यमातून HSRP नंबर प्लेट बसविण्याची सुविधा उपलब्ध असून, सर्व वाहनधारकांनी तात्काळ आपल्या वाहनांवर HSRP बसवून घ्यावी. अन्यथा तपासणीदरम्यान नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, गडचिरोली यांनी दिला आहे.

परिवहन विभागाने ही तपासणी मोहीम पुढील काळातही सातत्याने सुरू राहणार असल्याचे स्पष्ट केले असून, वाहनधारकांनी नियमांचे पालन करून सुरक्षित व जबाबदार वाहतूक व्यवस्थेस सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos