महत्वाच्या बातम्या

 गडचिरोली प्रकल्पातील आश्रमशाळांमध्ये प्रवेशोत्सवाचे आयोजन


- दीर्घ उन्हाळी सुट्टीनंतर ३० जूनपासून वाजणार शाळेची घंटा; नवागतांसह सर्व विद्यार्थ्यांचे होणार उत्साहात स्वागत

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, गडचिरोली अंतर्गत येणाऱ्या २४ शासकीय व १७ अनुदानित आश्रमशाळांमध्ये मंगळवार, ३० जून रोजी नवीन शैक्षणिक वर्षाची उत्साहपूर्ण सुरुवात होणार आहे. दीर्घ उन्हाळी सुट्टीनंतर शाळेची घंटा पुन्हा एकदा वाजणार असून, विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी सर्व आश्रमशाळांमध्ये प्रवेशोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

शाळेच्या पहिल्याच दिवशी आश्रमशाळांमध्ये उत्साहवर्धक व चैतन्यमय वातावरण निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. नव्याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसह सर्व विद्यार्थ्यांचे औक्षण करून व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात येणार असून, दीर्घ सुट्टीनंतर पुन्हा एकदा शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने परिसर दुमदुमणार आहे.

विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वेळेत उपलब्ध व्हावे यासाठी शाळेच्या पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी आवड निर्माण व्हावी, गुणवत्तापूर्ण शिक्षणाची प्रेरणा मिळावी तसेच पालकांचा शैक्षणिक प्रक्रियेत सहभाग वाढावा या उद्देशाने प्रवेशोत्सवासोबतच पालक मेळाव्याचेही आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात उपस्थित मान्यवर विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व, नियमित उपस्थिती आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाबाबत मार्गदर्शन करणार आहेत.

आदिवासी विकास विभाग, नागपूरच्या अपर आयुक्त आयुषी सिंह यांच्या आदेशानुसार प्रवेशोत्सव कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रत्येक आश्रमशाळेत संपर्क अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

याअंतर्गत सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी अरुण एम. हे गडचिरोली येथील शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळेत उपस्थित राहणार आहेत. सहाय्यक प्रकल्प अधिकारी वहिद शेख हे कोटगुल आश्रमशाळेत, सहाय्यक प्रकल्प अधिकारी डॉ. प्रभू सादमवार हे अंगारा आश्रमशाळेत, तर नियोजन अधिकारी प्रफुल पोरेड्डीवार हे कारवाफा आश्रमशाळेत प्रवेशोत्सव कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. तसेच इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांचीही संपर्क अधिकारी म्हणून उर्वरित आश्रमशाळांवर नियुक्ती करण्यात आली आहे.

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पामार्फत आयोजित करण्यात आलेल्या या प्रवेशोत्सवामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी सकारात्मक वातावरण निर्माण होण्यास मदत होणार असून, नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात आनंददायी, प्रेरणादायी आणि उत्साहपूर्ण वातावरणात होणार असल्याचा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos