कोळसाखाणीग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईसाठी महत्त्वपूर्ण बैठक : १९ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथे चर्चा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : कोळसाखाणीमुळे प्रभावित शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईसाठी शासनाची कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाले असून, त्यांच्या मागणीवरून महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली समितीची बैठक १९ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीत कोळसाखाणीमुळे बाधित शेतकऱ्यांना होणाऱ्या नुकसानाची माहिती गोळा करून, शासन निर्णय निर्गमित करण्यासाठी आवश्यक कार्यपद्धती, निकष आणि अंमलबजावणीची रूपरेषा ठरवण्यात येणार आहे. यामध्ये शेतजमिनी, पिकांचे नुकसान, पर्यावरणीय परिणाम तसेच उपजीविकेवर होणारा परिणाम यांचा सखोल आढावा घेतला जाणार आहे.
जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना कोळसा उत्खनन व संबंधित औद्योगिक उपक्रमांमुळे शेती उत्पादनात घट, पिकांचे नुकसान आणि आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर, बाधित शेतकऱ्यांना न्याय मिळावा आणि नुकसानभरपाईची पारदर्शक व प्रभावी यंत्रणा तयार व्हावी, यासाठी आमदार मुनगंटीवार यांनी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा केला आहे. त्यांनी महाराष्ट्र विधानसभेत देखील या विषयावर ठोस मागणी केली होती.
१९ जूनच्या बैठकीत जिल्ह्यातील कोळसाखाणीग्रस्त भागातील वास्तव परिस्थिती, शेतकऱ्यांच्या तक्रारी, नुकसानाचे स्वरूप आणि आवश्यक प्रशासकीय उपाययोजना यावर चर्चा होईल. या चर्चेच्या आधारे शासन निर्णय निर्गमित करण्याची प्रक्रिया व अंमलबजावणीची कार्यपद्धती ठरवली जाईल. या बैठकेला जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्व आहे, असे सांगितले जाते.
शेतकरी, नागरिक आणि ग्रामस्थांनी आपल्या सूचना, तक्रारी, मागण्या तसेच कोळसाखाणीमुळे होणाऱ्या नुकसानाची माहिती सहाय्यक संजय राईंचवार यांच्या ९५५२७९९६०८ या व्हॉट्सॲप क्रमांकावर पाठवावी. प्राप्त होणाऱ्या सर्व सूचनांचा आढावा घेऊन १९ जूनच्या बैठकीत अपर मुख्य सचिव विकास खारगे यांच्या समक्ष मांडण्यात येईल आणि त्यावर प्रभावी कार्यवाही केली जाईल, असे आमदार मुनगंटीवार यांनी नागरिकांना आवाहन केले आहे.
News - Chandrapur




Petrol Price




