गडचिरोलीत तस्करीसाठी नेली जाणारी विदेशी दारू जप्त : ४.८१ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : गडचिरोली जिल्ह्यात तस्करीसाठी नेली जात असलेली २५ पेटी विदेशी दारू आणि कारसह एकूण ४ लाख ८१ हजार रुपयांचा मुद्देमाल ब्रम्हपुरी पोलिसांनी जप्त केला. ही कारवाई ६ जूनच्या रात्री गांगलवाडी–आरमोरी मार्गावरील नाल्याजवळ करण्यात आली. पोलिसांना पाहताच चालकाने कार रस्त्यावर सोडून अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पलायन केले.
मिळालेल्या माहितीनुसार, राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्या गडचिरोली दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर ब्रम्हपुरी पोलिसांनी गांगलवाडी टी-पॉइंट येथे विशेष बंदोबस्त लावला होता. बंदोबस्ताची जबाबदारी पूर्ण करून पथक परतत असताना पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की, काळ्या रंगाच्या एमएच-४९ एएस-२४२३ क्रमांकाच्या कारमधून गडचिरोली जिल्ह्यात विदेशी दारूची तस्करी केली जात आहे.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी गांगलवाडी–आरमोरी मार्गावरील नाल्याजवळ नाकाबंदी केली. काही वेळात संशयित कार तेथे येताना दिसताच पोलिसांनी तिला थांबविण्याचा इशारा दिला. मात्र चालकाने कार थांबवून घटनास्थळावरून पळ काढला.
पोलिसांनी कारची तपासणी केली असता त्यामध्ये २५ पेटी विदेशी दारू आढळून आली. दारूसह अंदाजे ४ लाख रुपयांची कार असा एकूण ४ लाख ८१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी फरार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध सुरू आहे. सदर कारवाई पोलीस निरीक्षक प्रमोद बानबले यांचा नेतृत्वात पोहवा रतन लेनगुरे, पोअं अमोल यांनी केले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बालाजी चव्हाण करीत आहेत.
News - Chandrapur




Petrol Price




