विश्वासाचा गैरफायदा घेत अकाउंटंटकडून २८.५० लाखांचा अपहार : रामनगर पोलिसांत गुन्हा दाखल


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : शहरातील नामांकित दुचाकी वाहन विक्री संस्थेतील अकाउंटंटने विश्वासघात करत कंपनीच्या खात्यातून तब्बल २८ लाख ५० हजार रुपयांचा अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी कंपनीचे संचालक शंकर गोकुलप्रसाद अग्रवाल यांच्या तक्रारीवरून रामनगर पोलिसांनी ४ जून रोजी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
प्राप्त माहितीनुसार, नागपूर रोडवरील दत्त नगर परिसरात असलेल्या शिवशक्ती व्हेईकल एजन्सी प्रा. लि. या शोरूमचे आर्थिक व्यवहार एचडीएफसी बँकेतील कंपनीच्या चालू खात्यामार्फत केले जातात. कंपनीतील अकाउंटंट हर्ष अशोककुमार खटवाणी याच्याकडे कर्मचाऱ्यांचे वेतन, जीएसटी, टीडीएस, एजन्सी पेमेंट्स तसेच इतर आर्थिक व्यवहारांची जबाबदारी सोपविण्यात आली होती.
कंपनीचा वार्षिक लेखापरीक्षण सुरू असताना आर्थिक व्यवहारांची तपासणी करण्यात आली. त्यावेळी काही संशयास्पद नोंदी आढळून आल्या. कर्मचाऱ्यांच्या वेतन यादीत शुभम साखरे व यश दुर्गे या नावांची नोंद दिसून आली. चौकशीअंती ही नावे अधिकृत कर्मचाऱ्यांच्या नोंदीत नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर संबंधित अकाउंटंटला नोकरीतून काढण्यात आले.
यानंतर कंपनीच्या एचडीएफसी बँक खात्याचे स्टेटमेंट तपासताना दुचाकी वाहनांच्या विमा हप्त्यांसाठी पाठविण्यात येणारी रक्कम विमा कंपनीऐवजी अन्य खात्यांमध्ये वळविण्यात आल्याचे निदर्शनास आले. अधिक चौकशी केल्यानंतर बंधन बँकेच्या एका खात्यात १७ जानेवारी ते २४ मार्च २०२६ या कालावधीत एकूण २६ व्यवहारांद्वारे २८ लाख ५० हजार रुपये जमा झाल्याचे उघड झाले.
बँकेकडून मिळालेल्या माहितीनुसार ही रक्कम पुढे हर्ष खटवाणी यांच्या स्टेट बँक ऑफ इंडिया खात्यासह इतर खात्यांमध्ये वळविण्यात आल्याचे समोर आले आहे. कंपनीच्या आर्थिक व्यवहारांवर पूर्ण विश्वास ठेवून जबाबदारी सोपविल्यानंतर आरोपीने विश्वासघात करून कंपनीची फसवणूक व आर्थिक अपहार केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
या प्रकरणी रामनगर पोलिसांनी हर्ष अशोककुमार खटवाणी तसेच व्यवहारात सहभागी असलेल्या इतर संशयितांविरुद्ध फसवणूक, अपहार व विश्वासघाताच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला असून आर्थिक गुन्ह्याचा सखोल तपास सुरू आहे. बँक व्यवहारांचे तांत्रिक विश्लेषण, खात्यांतील निधीची वळती आणि संभाव्य साथीदारांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास रामनगर पोलीस ठाण्याच्या ठाणेदार प्रभावती एकुरके करीत आहेत. कंपनीच्या आर्थिक व्यवस्थेतील या गंभीर गैरव्यवहारामुळे व्यापारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
News - Chandrapur




Petrol Price




