महत्वाच्या बातम्या

 गडचिरोलीच्या पाणीटंचाईवर दिलासा : ३ जूनपासून गोसेखुर्दचे पाणी वैनगंगेत


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : उन्हाळ्याच्या तीव्र झळांमुळे गडचिरोली शहरात निर्माण झालेल्या गंभीर पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. वैनगंगा नदी पात्रात गोसेखुर्द धरणातून पाणी सोडण्याच्या मागणीला अखेर मंजुरी मिळाली असून, येत्या ३ जूनपासून प्रत्यक्ष पाणी सोडण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे ५ जूनपासून शहराचा पाणीपुरवठा पूर्ववत सुरळीत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

शहरातील वाढत्या पाणीटंचाईच्या प्रश्नावर नगर परिषदेचे पाणीपुरवठा सभापती लीलाधर भरडकर यांनी गेल्या पाच दिवसांपासून सातत्याने पाठपुरावा केला. सहपालकमंत्री अॅड. आशिष जयस्वाल, जिल्हाधिकारी तसेच जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांशी सविस्तर चर्चा करून २९ मे रोजी यासंदर्भातील प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यानंतर भंडारा जिल्हाधिकाऱ्यांमार्फत गोसेखुर्द प्रकल्प प्रशासनाकडे वैनगंगा नदी पात्रात पाणी सोडण्याची विनंती करण्यात आली.

१ जून रोजी भंडारा जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. यावेळी भंडाऱ्याचे पालकमंत्री पंकज भोयर, अतिरिक्त जिल्हाधिकारी आणि जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी समन्वय साधून गडचिरोलीतील पाणीटंचाईची गंभीर परिस्थिती मांडण्यात आली. त्यानंतर अंतिम मंजुरीसाठी प्रस्ताव नागपूर येथील जलसंपदा विभागाच्या सचिवांकडे पाठविण्यात आला.

दरम्यान, गोसेखुर्द धरणाचे पाणी वैनगंगा नदी पात्रात पोहोचल्यानंतर ते शहराच्या उपसा केंद्रापर्यंत उपलब्ध राहावे यासाठी नगर परिषदेकडून तात्पुरता बंधारा उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. नदी पात्रात माती व रेतीच्या पोत्यांच्या साहाय्याने हा बंधारा उभारण्यात येत असून ३ जूनपर्यंत काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

गोसेखुर्दचे पाणी नदीपात्रात आल्यानंतर ते अडवून ठेवून शहराच्या मुख्य जलपुरवठा योजनेला पुरेसा पाणीसाठा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. प्रशासनाच्या या निर्णयामुळे गेल्या काही दिवसांपासून पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या गडचिरोलीकरांना मोठा दिलासा मिळणार असून, ५ जूनपासून नियमित व सुरळीत पाणीपुरवठा सुरू होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos