राष्ट्रवादी काँग्रेसची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचवा : जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालूका प्रतिनिधी / कोरची : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा खेड्यापाड्यातील कार्यकर्ता हा पक्षाचा खरा आत्मा असून सर्वसामान्य जनतेसाठी झटणारी आणि सर्वधर्मसमभाव जपणारी ही पक्षसंघटना आहे. पक्षाची विचारधारा तळागाळातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचविण्यासाठी कार्यकर्त्यांनी अधिक जोमाने काम करावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर यांनी केले.
कोरची तालुक्यातील बोटेकसा येथे ३१ मे रोजी आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्ता व पदाधिकारी आढावा बैठकीत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी मंचावर जिल्हा कार्यकारी अध्यक्ष नंदूभाऊ नरोटे, जिल्हा सचिव प्रदीप बागडे, आदिवासी विभागाचे जिल्हाध्यक्ष मोहन पुराण, तालुकाध्यक्ष अनिल केरामी, आदिवासी सेलचे तालुकाध्यक्ष मानुराम कुमरे, प्रा. संतोष मडावी आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना रवींद्र वासेकर म्हणाले, अजितदादांच्या जाण्याने पक्ष काही काळ पोरका झाल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली होती. मात्र, सुनेत्रा वहिनी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्ह्यात आमदार डॉ.धर्मराव बाबा आत्राम यांच्या कुशल नेतृत्वात पक्ष नव्या जोमाने संघटन मजबूत करत आहे. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भरघोस यश संपादन करेल, असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला.
जिल्हा कार्यकारी अध्यक्ष नंदूभाऊ नरोटे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, आदिवासी विद्यार्थी संघाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते आमदार डॉ.धर्मराव बाबा आत्राम यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दाखल झाले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील पक्षसंघटना अधिक मजबूत झाली असून कोरची तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सर्व जागांवर विजय मिळविण्याचा पक्षाचा निर्धार आहे.
यावेळी उपस्थित मान्यवरांनीही पक्ष संघटन वाढ, आगामी निवडणुका आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिल केरामी यांनी केले, तर संचालन श्रीराम कल्लो यांनी केले. आभार प्रदर्शन मानुराम कुमरे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी वीरेंद्र कोराम, रामसाय पोरेटी, प्रा. संतोष मडावी यांनी विशेष परिश्रम घेतले. बैठकीस कोरची तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, आदिवासी विद्यार्थी संघ तसेच इतर पक्षांतून राष्ट्रवादीत प्रवेश केलेले पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
News - Gadchiroli




Petrol Price




