पुण्यात युवक काँग्रेसच्या प्रदेश बैठकीत ॲड. विश्वजीत कोवासे यांचा सत्कार

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने पुणे येथे आयोजित प्रदेश कार्यकारिणी बैठकीत गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष विश्वजीत मारोतराव कोवासे यांचा भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चीब यांच्या हस्ते भव्य सत्कार करण्यात आला. या सत्कारामुळे गडचिरोली जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत बोलताना उदय भानू चीब यांनी ॲड. विश्वजीत कोवासे यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील राजकीय आणि संघटनात्मक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच काँग्रेस पक्षाची विचारधारा तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवून संघटना अधिक बळकट करण्यासाठी सातत्याने कार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.
गडचिरोलीसारख्या दुर्गम आणि आदिवासीबहुल जिल्ह्यात काँग्रेस पक्षाची संघटनात्मक ताकद वाढविण्यासाठी ॲड. कोवासे प्रभावी नेतृत्व करतील, असा विश्वासही राष्ट्रीय अध्यक्षांनी व्यक्त केला. जिल्ह्यातील युवकांना संघटित करून पक्षविस्तारासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.
या कार्यक्रमाला शिवराज मोरे, अजय चिकारा, नवज्योतसिंग सिंधु, शांभवी शुक्ला, नितेश राठोड, सौरभ पाटील म्हशाखेत्री यांच्यासह राज्यभरातील युवक काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सत्कारानंतर प्रतिक्रिया देताना ॲड. विश्वजीत कोवासे यांनी पक्षश्रेष्ठींनी दाखविलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. गडचिरोली जिल्ह्यात काँग्रेस पक्षाची संघटना अधिक मजबूत करण्यासाठी तसेच युवकांना पक्षाशी जोडण्यासाठी आपण अधिक जोमाने कार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पक्षाची विचारधारा सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आणि जनतेच्या प्रश्नांवर प्रभावीपणे आवाज उठविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
News - Gadchiroli




Petrol Price




