महत्वाच्या बातम्या

 टेकला ग्रामपंचायतीला मुख्य सचिवांच्या चमूची भेट : विकास कामांचा घेतला आढावा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालूका प्रतिनिधी / भामरागड : महाराष्ट्र शासनाचे मुख्य सचिव यांच्या प्रतिनिधी चमूने २४ मे २०२६ रोजी भामरागड पंचायत समिती अंतर्गत ग्राम पंचायत टेकला येथे भेट देत शासनाच्या विविध विकास कामांचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी गावातील नागरिकांशी संवाद साधून विविध वैयक्तिक लाभाच्या योजनांची माहिती जाणून घेण्यात आली.

मुख्य सचिवांचे प्रतिनिधी म्हणून ऋषिकेश शिरके आणि प्रतिक भावी यांनी ग्रामस्थांशी चर्चा करत शासनाच्या योजनांचा लाभ प्रत्यक्षात नागरिकांपर्यंत पोहोचत आहे की नाही, याची माहिती घेतली. यामध्ये आधार कार्ड, दिव्यांग ओळखपत्र, आयुष्मान कार्ड, गोल्डन कार्ड, घरकूल बांधकाम, सिंचन विहिरी, बोडी, मजगी, तलाव खोलीकरण, मत्स्य व्यवसाय, बचत गट सक्षमीकरण, बेरोजगार तरुणांसाठी प्रशिक्षण आदी योजनांचा आढावा घेण्यात आला.

तसेच वीज सुविधा नसलेल्या भागांमध्ये सोलर पॅनल बसविणे, माझी वसुंधरा अभियानांतर्गत वृक्षलागवड, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, अंतर्गत रस्त्यांची सुविधा याबाबतही चर्चा करण्यात आली. गावातील शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी सीबीएसई पद्धतीचे शिक्षण उपलब्ध व्हावे यासाठी नवीन शाळा इमारत उभारण्याची सूचनाही यावेळी करण्यात आली.

चमूने जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडी केंद्रांना भेट देऊन तेथील सोयीसुविधा, विद्यार्थ्यांची उपस्थिती, पोषण आहार आणि शैक्षणिक स्थितीची माहिती घेतली. ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेत संबंधित विभागांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या.

यावेळी तहसीलदार किशोर बागडे, गटविकास अधिकारी महेश वाढई, सहाय्यक प्रकल्प अधिकारी रोषना चव्हाण, तालुका आरोग्य अधिकारी मनीष धकाते, विस्तार अधिकारी गोपाल माकडे, बाल विकास प्रकल्प अधिकारी, वलके मॅडम, उपसरपंच बुकलु लेकामी, सदस्या मंगला दुर्वा, ग्राम पंचायत अधिकारी व्ही. पी. वेलादी, ग्राम पंचायत अधिकारी संतोष पुंगाटी, ग्राम महसूल अधिकारी कोडापे, अंगणवाडी सेविका सिता पुंगाटी, आशा वर्कर सगुणा दुर्वा, जया दुर्वा तसेच तालुकास्तरीय विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos