भेंडवीत मध्यरात्रीची थरारक घरफोडी : ५.३३ लाखांचा ऐवज लंपास, ग्रामीण भागात भीतीचे सावट


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : राजुरा तालुक्यातील भेंडवी परिसरात मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून तब्बल ५ लाख ३३ हजार ५०० रुपयांच्या सोन्या-नगदीवर डल्ला मारल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. या धक्कादायक प्रकारामुळे संपूर्ण परिसरात भीती व असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रमणय्या सुबय्या पचवा (४५) हे आपल्या कुटुंबासह भेंडवी येथे शेती व्यवसाय करीत वास्तव्यास आहेत.१२ एप्रिलच्या रात्री कुटुंबीय जेवण करून घराला कुलूप लावून बाहेरील मांडवात झोपले होते. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घराच्या मागील बाजूस असलेल्या ताटव्याला बांधलेला तार काढून आत प्रवेश केला.
घरात ठेवलेल्या बॅगेची चैन उघडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने व नगदी रक्कम लंपास केली. १३ एप्रिल रोजी सकाळी ही बाब उघडकीस येताच कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. चोरीस गेलेल्या ऐवजात ४० ग्रॅम सोन्याची चैन, चार सोन्याच्या बांगड्या, काळ्या मण्यांची पोत, तीन अंगठ्या, कानातील डोरले तसेच ७ हजार ५०० रुपये नगदी असा एकूण ५ लाख ३३ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेले.
विशेष म्हणजे, चोरट्यांनी अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने घराच्या मागील बाजूने प्रवेश करून चोरी केल्याने परिसरातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ग्रामीण भागात वाढत्या घरफोडीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी मागणी होत आहे.
या प्रकरणी राजुरा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३०५ व ३३१(४) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुमित परतेकी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अतुल राठोड करीत असून आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके कार्यरत आहेत.
News - Chandrapur




Petrol Price




