महत्वाच्या बातम्या

 अपघात मुक्त सेवा देण्यासाठी एसटीचे ११ जानेवारीपासून सुरक्षितता मोहीम


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / मुंबई : राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या निर्देशानुसार व राज्य शासनाच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षीप्रमाणे यंदाही एसटीमध्ये ११ जानेवारी ते २५ जानेवारी २०२३ दरम्यान सुरक्षितता मोहीम राबवली जात आहे.

सध्या दररोज सुमारे ४० लाख प्रवाशांना दळणवळणाची सुरक्षित सेवा देणारी एसटी महाराष्ट्राची लोकवाहिनी बनली आहे. गेल्या ७५ वर्षात अविरत आणि सुरक्षित सेवेच्या माध्यमातून प्रवाशांच्या मनात एसटीबद्दल विश्वासार्हतेची भावना निर्माण झाली आहे. या विश्वासाला बळकटी देण्याच्या उद्देशाने एसटी महामंडळामध्ये दरवर्षी जानेवारी-फेब्रुवारी महिन्यामध्ये सुरक्षितता मोहीम राबविण्यात येते. या मोहिमे दरम्यान चालकांचे प्रबोधन, प्रशिक्षण, आरोग्य तपासणी, वाहन परवाना तपासणी, गाड्यांची तांत्रिक तंदुरुस्ती अशा अनेक बाबींवर भर दिला जातो.

सध्या महाराष्ट्रात एसटीमध्ये सुमारे २४ हजार ३८९ चालक कार्यरत आहेत. अपघाताची विविध कारणे शोधून त्यावर उपाययोजना करण्याच्या दृष्टीने एसटीने चालकांसाठी वेळोवेळी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले आहे. चालकांना सुरक्षित प्रवासाचे महत्व पटवून देण्याबरोबरच त्यांचे मानसिक संतुलन सुदृढ करण्याच्या दृष्टीने आगार पातळीवर प्रबोधन देखील करण्यात येत आहे. या सर्वांचा परिणाम म्हणून गेल्या काही वर्षात इतर प्रवासी वाहनांच्या तुलनेत एसटीच्या अपघातांची संख्या कमी आहे.

या सुरक्षितता मोहिमेच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी, वाहतुकीचे नियमाचे पालन, उत्तम शरीर प्रकृती आणि मन:स्वास्थ्य या चतुसुत्रीचे पालन करीत एसटीच्या चालकांनी यंदाच्या वर्षांमध्ये सर्वसामान्य जनतेला अपघात विरहित सेवा देण्याचे आवाहन एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी केले आहे.





  Print






News - Rajy




Related Photos