महत्वाच्या बातम्या

 आरटीई प्रवेश प्रक्रियेतील विलंबामुळे पालकांमध्ये तीव्र नाराजी : तात्काळ यादी जाहीर करण्याची माकप-आजाद ची मागणी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : आरटीई (Right to Education) अंतर्गत २५% मोफत प्रवेशासाठीची लॉटरी प्रक्रिया पूर्ण होऊनही अद्याप निवड यादी जाहीर करण्यात आलेली नाही. तसेच जिल्ह्यातील बऱ्याच खाजगी शाळा सुरु झाल्या असल्या तरी पालकांना एसएमएसद्वारे कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नसल्यामुळे जिल्ह्यातील पालक व विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर संभ्रम, अस्वस्थता व नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

आजाद समाज पार्टी व मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या वतीने या गंभीर प्रश्नाची दखल घेत शिक्षण विभागाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी आरटीई अंतर्गत शिक्षणाची संधी अत्यंत महत्त्वाची असताना, प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची टीका करण्यात आली.

सदर प्रकरणी पक्षांच्या वतीने खालील प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत -
- आरटीई प्रवेशासाठीची निवड यादी तात्काळ जाहीर करावी.
- पालकांना एसएमएस व अधिकृत माध्यमांद्वारे स्पष्ट व वेळेवर माहिती द्यावी.
- प्रवेश प्रक्रियेचे पारदर्शक व निश्चित वेळापत्रक जाहीर करावे.
- तांत्रिक पडताळणी प्रक्रिया तातडीने पूर्ण करून प्रवेश प्रक्रिया सुरू करावी.

पक्षांच्या प्रतिनिधींनी इशारा दिला आहे की, विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित या प्रश्नाकडे प्रशासनाने तात्काळ लक्ष न दिल्यास येत्या काळात लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.

शिक्षण हा प्रत्येक मुलाचा मूलभूत हक्क आहे. प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे तो हक्क बाधित होऊ देणार नाही, अशी ठाम भूमिका पक्षांनी व्यक्त केली आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos