महत्वाच्या बातम्या

 गडचिरोलीत एलपीजी गॅसची टंचाई नाही : आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांची माहिती


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : गडचिरोली विधानसभा मतदारसंघात एलपीजी गॅस सिलेंडरच्या पुरवठ्याबाबत निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी पुरवठा विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच सर्व गॅस एजन्सी धारकांसोबत आढावा बैठक घेतली. या बैठकीत गॅस पुरवठ्याची सविस्तर माहिती घेण्यात आली.

बैठकीदरम्यान गडचिरोली विधानसभा क्षेत्रामध्ये एलपीजी सिलेंडरचा नियमित पुरवठा सुरू असून कोणत्याही प्रकारची वास्तविक टंचाई नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. मात्र काही ग्राहकांकडून आवश्यकतेपेक्षा जवळपास तिप्पट प्रमाणात सिलेंडरचे बुकिंग केले जात असल्यामुळे पुरवठा यंत्रणेवर अनावश्यक ताण येत असून त्यामुळे तात्पुरती टंचाई असल्याचा भास निर्माण होत असल्याचे निदर्शनास आले.

सर्व गॅस एजन्सींकडे एलपीजी सिलेंडरचा पुरेसा साठा उपलब्ध असून गडचिरोली विधानसभा क्षेत्रासह देशात कुठेही गॅसची टंचाई नसल्याचे आमदार डॉ. नरोटे यांनी सांगितले.

यावेळी त्यांनी मतदारसंघातील सर्व गॅस ग्राहकांना आवाहन करताना सांगितले की, नागरिकांनी अनावश्यक किंवा घाईघाईने गॅस बुकिंग करू नये. नियमित गरजेनुसारच सिलेंडरची नोंदणी करावी, जेणेकरून सर्व ग्राहकांना वेळेवर गॅस उपलब्ध होण्यास मदत होईल.

तसेच व्यावसायिक (कमर्शियल) गॅस सिलेंडरबाबत शासनाचे धोरण जाहीर झाले असून येत्या दोन ते तीन दिवसांत नोंदणीकृत व्यावसायिक ग्राहकांना शासनाने निश्चित केलेल्या प्रमाणानुसार नियमित सिलेंडर पुरवठा सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे सध्या निर्माण झालेल्या अडचणी लवकरच दूर होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

या बैठकीस सर्व गॅस एजन्सी मालक तसेच पुरवठा विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos