चांदा महाकाली चित्रपटातून चंद्रपूरच्या धार्मिक वैभवाला देशव्यापी ओळख मिळणार : आ. किशोर जोरगेवार


- श्री माता महाकालीच्या महात्म्यावर आधारित मराठी चित्रपटाच्या निर्मितीचा शुभारंभ; श्रद्धा, भक्ती आणि पुरातन इतिहास देशभर पोहोचविण्याचा प्रयत्न
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : चंद्रपूरची आराध्य दैवत असलेल्या श्री माता महाकाली यांच्या महात्म्याचा, पुरातन इतिहासाचा आणि चंद्रपूरच्या समृद्ध धार्मिक व सांस्कृतिक परंपरेचा गौरव करणारा ‘चांदा महाकाली’ हा मराठी चित्रपट निश्चितच चंद्रपूरच्या धार्मिक वैभवाला देशव्यापी ओळख मिळवून देणारा ठरेल, असा विश्वास आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केला. या चित्रपटाच्या माध्यमातून श्री माता महाकाली मंदिराचा समृद्ध इतिहास, मातेचे महात्म्य आणि लाखो भाविकांच्या मनातील श्रद्धा देशभर पोहोचण्यास मदत होईल, असेही त्यांनी सांगितले.
चंद्रपूरच्या आराध्य दैवत श्री माता महाकाली यांच्या पावन चरणी नतमस्तक होऊन भव्य मराठी चित्रपट चांदा महाकालीच्या निर्मितीचा शुभारंभ श्री माता महाकाली मंदिर परिसरात करण्यात आला. या मंगलमय सोहळ्याला आमदार किशोर जोरगेवार यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी त्यांनी चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक, लेखक, कलाकार आणि संपूर्ण चित्रपट चमूशी संवाद साधत या उपक्रमाचे स्वागत केले. तसेच चित्रपटाच्या यशस्वी निर्मितीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलताना आमदार जोरगेवार म्हणाले की, श्री माता महाकाली हे चंद्रपूरकरांचे श्रद्धास्थान असून, लाखो भाविकांची मातेवर अपार श्रद्धा आहे. चंद्रपूरची ओळख केवळ औद्योगिक शहर म्हणून मर्यादित न राहता येथील धार्मिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वैभवाची ओळखही देशभर व्हावी, यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील आहोत. जिल्ह्यातील धार्मिक आणि औद्योगिक पर्यटनाला चालना मिळावी, तसेच पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिक विकासाच्या नव्या संधी निर्माण व्हाव्यात, हा या प्रयत्नांमागील मुख्य उद्देश आहे.
श्री माता महाकाली मंदिराचा पुरातन इतिहास, मातेचे महात्म्य आणि भाविकांच्या मनातील श्रद्धाभाव यांचे दर्शन चांदा महाकाली या चित्रपटातून घडणार आहे. चित्रपट हे समाजापर्यंत विचार, संस्कृती, परंपरा आणि ऐतिहासिक वारसा पोहोचविण्याचे प्रभावी माध्यम आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या माध्यमातून चंद्रपूरच्या धार्मिक वैभवाची माहिती राज्याच्या सीमा ओलांडून देशभरातील भाविक आणि रसिकांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल, असेही त्यांनी नमूद केले.
चंद्रपूरच्या पर्यटन विकासासाठी श्री माता महाकाली मंदिर परिसराच्या विकासासह विविध स्तरांवर प्रयत्न सुरू आहेत. धार्मिक पर्यटनाला चालना मिळाल्यास मंदिराची ओळख अधिक व्यापक होण्याबरोबरच जिल्ह्यातील स्थानिक व्यवसाय, रोजगार आणि पर्यटनाशी संबंधित विविध क्षेत्रांनाही त्याचा फायदा होऊ शकतो. या दृष्टीने श्री माता महाकाली यांच्या महात्म्यावर आधारित चित्रपटाची निर्मिती होणे ही चंद्रपूरकरांसाठी आनंदाची आणि अभिमानाची बाब असल्याचे आमदार जोरगेवार यांनी सांगितले.
या चित्रपटाच्या निर्मितीसाठी पुढाकार घेणाऱ्या निर्माते, दिग्दर्शक, लेखक आणि कलाकारांचे त्यांनी अभिनंदन केले. चंद्रपूरच्या श्रद्धा, भक्ती आणि सांस्कृतिक वारशाला कलात्मक माध्यमातून देशभर पोहोचविण्याचा हा प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहे. चित्रपटाच्या निर्मिती प्रक्रियेत आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यासाठी आपण सदैव तत्पर असल्याची ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली. चित्रपटाची निर्मिती यशस्वीरीत्या पूर्ण होऊन भाविक आणि रसिक प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळावा, अशी सदिच्छाही त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, या सोहळ्यात श्री महाकाली माता महोत्सव ट्रस्टच्या वतीने चित्रपटातील कलाकार तसेच चित्रपट निर्मितीसाठी सहकार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. मंदिर परिसरात आयोजित या कार्यक्रमामुळे संपूर्ण चित्रपट चमूमध्ये उत्साहाचे वातावरण होते.
यावेळी श्री महाकाली माता महोत्सव ट्रस्टचे सुनील महाकाले, सदस्या सविता दंढारे, मिलिंद गम्पावार, भाजपचे माजी महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, राष्ट्रीय कार्यकारिणी परिषद सदस्य तुषार सोम, किसान मोर्चाचे अध्यक्ष संजय बुरघाटे, कामगार झोपडपट्टी आघाडीचे अध्यक्ष रामकुमार आकापेल्लीवार, युवा नेते रघुवीर अहिर, ज्येष्ठ नेते अजय जैस्वाल, नगरसेवक आशिष मासिरकर, पूनम तिवारी, सुमित बेले, ईश्वर विरूटकर यांच्यासह चित्रपटाचे कलाकार, निर्मिती चमू आणि भाविक उपस्थित होते.




Petrol Price




