शेतशिवारात झाडावर बसलेल्या अस्वलाची परिसरात खळबळ : गोरेगाव वनविभागाची रेस्क्यू मोहीम सुरू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गोंदिया : गोरेगाव गोंदिया-कोहमारा महामार्गावरील जानाटोला परिसरात शनिवारी दुपारी एक अनोखी व धक्कादायक घटना उघडकीस आली. येथील एका शेतशिवारातील झाडावर एका अस्वलाने आसरा घेतल्याचे निदर्शनास आल्याने परिसरात मोठी खळबळ माजली आहे.
महामार्गावरून जात असलेल्या काही नागरिकांना झाडावर काहीतरी हालचाल होत असल्याचे लक्षात आले. जवळून पाहिल्यानंतर त्यांना झाडावर एक मोठे अस्वल आरामात बसलेले दिसले. ही माहिती क्षणार्धात परिसरात पसरली आणि आजूबाजूच्या गावांतील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. महामार्गालगत असलेले हे शेत असल्याने ये-जा करणारे प्रवासीही थांबून अस्वलाचे दर्शन घेत होते.
दरम्यान, ही घटना समजताच गोरेगाव वनविभागाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी परिस्थितीचा आढावा घेत अस्वलाला सुरक्षित रित्या झाडावरून खाली आणण्यासाठी रेस्क्यू मोहीम सुरू केली आहे. नागरिकांची गर्दी व गोंधळामुळे अस्वल घाबरून अधिक आक्रमक होऊ नये, यासाठी वनविभागाकडून गर्दी हटवण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
सध्या वनविभागाचे कर्मचारी योग्य त्या साधनसामुग्रीसह घटनास्थळी उपस्थित असून, अस्वलाला सुरक्षितपणे पकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये एकाच वेळी कुतूहल आणि भीतीचे वातावरण पसरले आहे.
News - Gondia




Petrol Price




