महत्वाच्या बातम्या

 संविधानाच्या जयघोषाने दुमदुमले बल्लारपूर : सन्मान रॅलीत महिलांसह नागरिकांचा मोठा सहभाग


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : भारतीय संविधानाचा सन्मान, लोकशाही मूल्यांचे संवर्धन आणि संविधान रक्षणाचा संदेश देण्यासाठी २६ नोव्हेंबर रोजी बल्लारपुरात भव्य भारतीय संविधान सन्मान रॅली काढण्यात आली. वंचित बहुजन आघाडी, वंचित बहुजन महिला आघाडी, भारतीय बौद्ध महासभा आणि समता सैनिक दल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या रॅलीत महिला, पुरुष, युवक आणि लहान मुलांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदविला.

महाबोधी महाविहार, वैशाली चौक येथून रॅलीला सुरुवात झाली. प्रारंभी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रगीत गायन करून रॅली मार्गस्थ झाली. शहराध्यक्ष उमेश कडू यांच्या नेतृत्वात निघालेली ही रॅली विजयस्तंभ, झाशी राणी चौक, सुभाष टॉकीज चौक, बस स्टँड मार्गे रेल्वे चौक येथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकापर्यंत पोहोचली. तेथे पुन्हा संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले.

रॅलीमध्ये लहान मुलांनी महापुरुषांची वेशभूषा करून साकारलेले देखावे आणि भारतीय संविधानाची प्रतिकृती विशेष आकर्षण ठरली. संपूर्ण मार्गावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय संविधानाच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. यावेळी भंते आनंद यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. शहराध्यक्ष उमेश कडू यांनी महिलांच्या मोठ्या सहभागाचे कौतुक करताना संविधानाच्या रक्षणाची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची असल्याचे सांगितले. महिलांनी घेतलेला पुढाकार हा संविधानाविषयीच्या जागरूकतेचा आणि बांधिलकीचा पुरावा असल्याचे त्यांनी नमूद केले.

रॅलीच्या यशस्वितेसाठी महिला आघाडीच्या ज्येष्ठ सल्लागार सत्यभामाताई भाले, तालुकाध्यक्षा नम्रता साव, शहराध्यक्षा रेखाताई पागडे, शहर महासचिव गौतम रामटेके, शहर संघटक राकेश पेटकर, युवा आघाडीचे तालुकाध्यक्ष अभिलाष चुनारकर यांच्यासह सुप्रियाताई चंदनखेडे, स्वीटी लोंढे, संगीता साखरे, प्रज्ञाताई नमनकर, जोशीला वाघाडे, अनिता शंभरकर, शंकर वनकर, राहुल डांगे, सूरज शृंगारे, मोनू खोब्रागडे आणि प्रियंकेश शिंगाडे यांनी परिश्रम घेतले. अजय चव्हाण, धनंजय रिंगणे, तुलाराम ढवडे आणि बंडूभाऊ मोटघरे यांनी सहकार्य केले. शेवटी राष्ट्रगीताने रॅलीची उत्साहात सांगता झाली.





  Print






Related Photos