उमेदच्या दिवाळी फराळ महोत्सवातून १७ लाख ६० हजाराची उलाढाल!


१२९ स्टॉल्सच्या माध्यमातून महिला बचतगटांच्या उत्पादनांना मोठा प्रतिसाद : १७४ महिलांचा सहभाग
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासोबतच त्यांच्या उत्पादनांना स्थानिक बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी उमेद जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्षाच्यावतीने दिवाळी फराळ महोत्सवचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाला जिल्हाभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यातील विविध ठिकाणी उभारण्यात आलेल्या एकूण १२९ स्टॉल्सच्या माध्यमातून १७ लाख ६० हजार ५५९ रुपयांची उलाढाल नोंदविण्यात आली.
उमेद अभियानांतर्गत ग्रामीण भागातील महिला बचतगटांनी उत्पादित केलेल्या पारंपरिक दिवाळी फराळासह विविध खाद्यपदार्थ, शोभेच्या वस्तू, आकर्षक सजावटीचे साहित्य, लक्ष्मीमूर्ती तसेच हस्तकलेच्या वस्तूंना ग्राहकांकडून चांगली मागणी मिळाली. या महोत्सवामुळे महिलांना स्वतःच्या उत्पादनांची विक्री करण्यासाठी हक्काची बाजारपेठ उपलब्ध झाली. त्यांच्या व्यवसायाला आर्थिक बळ मिळाले. उपक्रमासाठी मुख्य कार्यकरी अधिकारी पराग सोमण, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणाच्या प्रकल्प संचालक वैशाली रसाळ, उमेदचे जिल्हा अभियान व्यवस्थापक नीरज नखाते, विपणन जिल्हा व्यवस्थापक मनीष कावडे यांचे मार्गदर्शन लाभले.
जिल्हास्तरावर आयोजित महोत्सवामध्ये एकूण२३ स्टॉल्स उभारण्यात आले होते. त्यामध्ये ३१ महिला सहभागी झाल्या होत्या. या स्टॉल्सच्या माध्यमातून ५लाख ६५ हजार ३७८ रुपयांची विक्री झाली. तसेच तालुकास्तरावर समुद्रपूर, कारंजा, हिंगणघाट, सेलू, पुलगाव-देवळी आणि आर्वी येथे आयोजित महोत्सवामध्ये १०६ स्टॉल्स उभारण्यात आले होते. यामध्ये १४३ महिलांनी सहभाग घेतला असून ११ लाख ९५ हजार १८१ रुपयांची विक्री नोंदविण्यात आली.
या उपक्रमामुळे ग्रामीण महिलांच्या पारंपरिक पाककला, कौशल्य आणि उद्योजकतेला व्यासपीठ मिळाले. महिलांनी केवळ उत्पादन निर्मितीपुरते मर्यादित न राहता स्वतः विक्री, ग्राहकांशी संवाद आणि आर्थिक व्यवहारांचे व्यवस्थापन करण्याचा अनुभव घेतला. दिवाळीच्या सणाच्या माध्यमातून महिला बचतगटांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्याचा उमेद अभियानाचा हा प्रयत्न यशस्वी ठरला आहे. महिलांच्या कष्टाला बाजारपेठ आणि त्यांच्या उत्पादनांना ग्राहकांचा प्रतिसाद मिळाल्याने ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या दिशेने हा महोत्सव महत्त्वपूर्ण ठरला आहे, असे उमेदच्यावतीने कळविण्यात आले आहे.




Petrol Price




