एलसीबीची कारवाई : क्रेटा कारमधून विदेशी मद्याची अवैध वाहतूक, ११.३७ लाखांचा मुद्देमाल जप्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : विदेशी मद्याची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने धडक कारवाई करत ताब्यात घेतले. भद्रावती हायवेवरील जमघाट हॉटेलसमोर नाकाबंदी करून करण्यात आलेल्या या कारवाईत मोठ्या प्रमाणात रॉयल स्टॅग विदेशी मद्य आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली हुंदाई क्रेटा कार असा एकूण ११ लाख ३७ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई १६ नोव्हेंबर रोजी करण्यात आली.
या प्रकरणी विलास किसन रंगारी ४५ वर्ष , रा. सुरक्षा नगर, भद्रावती आणि मिलिंद गोरखनाथ रामटेके ४८ वर्ष , रा. शिवाजीनगर, भद्रावती या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याविरुद्ध भद्रावती पोलीस ठाण्यात अप. क्र. १०६९/२६ अन्वये महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ६५(ई)(अ) व ८३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक भद्रावती परिसरात गस्तीवर असताना विदेशी मद्याची अवैध वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी भद्रावती हायवेवरील जमघाट हॉटेलसमोर नाकाबंदी केली. यावेळी संशयास्पद हुंदाई क्रेटा कार (क्र. MH31EF 3700) अडवून तपासणी केली असता, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात रॉयल स्टॅग विदेशी मद्य आढळून आले. पोलिसांनी मद्यसाठ्यासह कार जप्त केली.
जप्त केलेल्या मद्यामध्ये १८० मिलीच्या रॉयल स्टॅगच्या १९२ निपा, किंमत ४८ हजार रुपये, ९० मिलीच्या ४०० निपा, किंमत ५६ हजार रुपये आणि २००० मिलीच्या १२ बंपर, किंमत ३३ हजार ६०० रुपये, असा एकूण १ लाख ३७ हजार ६०० रुपयांचा मद्यसाठा आहे. तसेच सुमारे १० लाख रुपये किमतीची क्रेटा कार जप्त करण्यात आली. अशा प्रकारे एकूण ११ लाख ३७ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. सदर कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक सर्वेश बेलसरे, पोलीस हवालदार सुभाष गोहोकार, सचिन गुरनुले, रजनीकांत पुठ्ठावार, पोलीस शिपाई विठ्ठल काकडे, प्रफुल्ल पुप्पलवार, प्रतीक हेमके आणि वाहनचालक दिनेश अराडे यांनी केली.




Petrol Price




