शेतकरी अपघात सुरक्षा योजनेत वर्धा जिल्ह्यातील ६९ प्रस्ताव मंजूर


- अपघातग्रस्त शेतकरी व त्यांच्या कुटुंबीयांना मिळणार आर्थिक आधार; निधी प्राप्त होताच अनुदानाची रक्कम थेट बँक खात्यात
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : शेती व्यवसाय करताना होणाऱ्या अपघातांमध्ये शेतकरी किंवा शेतमजुरांचा मृत्यू झाल्यास अथवा त्यांना कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळावी, या उद्देशाने राज्य शासनामार्फत गोपीनाथ मुंडे शेतकरी, भूमिहीन शेतमजूर, महिला शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत वर्धा जिल्ह्यातील आठही तालुक्यांमधील एकूण ६९ प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित लाभार्थी आणि मृत शेतकऱ्यांच्या वारसांना लवकरच आर्थिक मदत मिळण्याची अपेक्षा आहे.
शेती व्यवसायात विविध कामे करताना अनेकदा अपघात घडतात. शेतात काम करताना, शेती साहित्य हाताळताना किंवा अन्य शेतीविषयक कामांदरम्यान अपघात होऊन शेतकऱ्यांचा मृत्यू अथवा कायमस्वरूपी अपंगत्व येण्याच्या घटना घडतात. अशा परिस्थितीत संबंधित कुटुंबाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागू नये, यासाठी शासनाने ही योजना सुरू केली आहे.
या योजनेत १० ते ७५ वर्षे वयोगटातील वहितीधारक खातेदार शेतकरी, भूमिहीन शेतमजूर, महिला शेतकरी तसेच त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे. अपघाती मृत्यू झाल्यास संबंधित शेतकरी किंवा शेतमजुरांच्या वारसांना दोन लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान दिले जाते. तसेच अपघातामुळे दोन्ही डोळे, दोन्ही हात किंवा दोन्ही पाय निकामी झाल्यास दोन लाख रुपयांची मदत देण्यात येते. तर एक डोळा, एक हात किंवा एक पाय निकामी झाल्यास एक लाख रुपयांचे अनुदान मंजूर केले जाते.
निधी प्राप्त होताच लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम -
वर्धा जिल्ह्यातील आठही तालुक्यांमधून प्राप्त झालेल्या प्रस्तावांची छाननी करून ६९ प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे. शासनस्तरावरून निधी उपलब्ध होताच मंजूर अनुदानाची रक्कम संबंधित लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांनी अनुदान वितरणाच्या प्रक्रियेबाबत माहिती घेणे आवश्यक आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र शेतकरी तसेच अपघातात मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या वारसांनी अधिक माहितीसाठी आपल्या नजीकच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.




Petrol Price




