महत्वाच्या बातम्या

 दहा वर्षांनंतर दिवाळीत पुन्हा कुमनारमध्ये; गावाच्या सर्वांगीण विकासासाठी अ‍ॅड. लालसू नोगोटी यांचा पुढाकार


- महसूल गावाचा दर्जा, पाणी, वीज, रस्ते, वनहक्क आणि रोजगारनिर्मितीसाठी आठ कलमी विकास आराखड्याचे आवाहन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / भामरागड : भामरागड तालुक्यातील छत्तीसगड सीमेलगत घनदाट जंगलात वसलेल्या कुमनार या अतिदुर्गम माडिया आदिवासी गावात अ‍ॅड. लालसू नोगोटी, माजी जिल्हा परिषद सदस्य यांनी दहा वर्षांनंतर पुन्हा दिवाळी साजरी केली. ८ व ९ नोव्हेंबर रोजी झालेल्या या भेटीदरम्यान त्यांनी गावातील प्रत्येक कुटुंबाशी संवाद साधून शिक्षण, आरोग्य, शेती, शासकीय योजना आणि कायदेविषयक हक्कांबाबत मार्गदर्शन केले. तसेच गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आठ कलमी आराखडा मांडत ग्रामस्थांनी सामूहिक पुढाकार घेण्याचे आवाहन केले.

लाहेरी ग्रामपंचायतीपासून सुमारे २० किलोमीटर अंतरावर असलेल्या कुमनार गावात आजही पिण्याचे पाणी, वीज आणि रस्त्यांसारख्या मूलभूत सुविधांचा अभाव आहे. या समस्या दूर करण्यासोबतच गावाला आर्थिक व सामाजिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी दीर्घकालीन नियोजन करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

२०१६ मध्ये गावाला प्रशासकीय ओळख मिळवून दिली -
अ‍ॅड. नोगोटी यांनी नोव्हेंबर २०१६ मध्ये पहिल्यांदा कुमनारला भेट दिली होती. त्यावेळी या वस्तीची प्रशासनाकडे अधिकृत नोंद नसल्याने नागरिकांना शासकीय कागदपत्रे आणि विविध योजनांचा लाभ मिळविण्यात अडचणी येत होत्या. त्यांनी सातत्याने पाठपुरावा, निवेदने आणि प्रशासकीय समन्वयातून कुमनार वस्तीची बाब शासनाच्या निदर्शनास आणून दिली. त्यांच्या प्रयत्नांनंतर कुमनारला अधिकृत मान्यता मिळून लाहेरी ग्रामपंचायतीचा टोला म्हणून नोंद करण्यात आली.

या मान्यतेमुळे ग्रामस्थांना रहिवासी दाखले, आधार कार्ड, रेशन कार्ड, जातीचे प्रमाणपत्र आणि मतदार ओळखपत्र मिळविण्याचा मार्ग मोकळा झाला. मुलांना शासकीय शाळांमध्ये प्रवेश मिळू लागला, विविध योजनांचा लाभ घेणे शक्य झाले आणि ग्रामस्थांनी प्रथमच मतदानाचा घटनात्मक अधिकार बजावला. या घटनेची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या प्रश्नपत्रिकेतही दखल घेण्यात आली होती.

आठ कलमी विकास आराखड्याचे आवाहन -
यंदाच्या भेटीत अ‍ॅड. नोगोटी यांनी गावाच्या विकासासाठी आठ महत्त्वपूर्ण मुद्दे मांडले. कुमनारला स्वतंत्र महसूल गावाचा दर्जा मिळविण्यासाठी पाठपुरावा करणे, ग्रामकोष समिती स्थापन करून बँक खाते उघडणे, स्वच्छ पिण्याच्या पाण्यासाठी बोअरवेल व सुरक्षित पाणीपुरवठ्याची व्यवस्था करणे, गावात वीज पोहोचविण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणे आणि तोपर्यंत सौरऊर्जेचा पर्याय उपलब्ध करणे, वनहक्क कायद्यानुसार वैयक्तिक व सामुदायिक वनहक्क दावे तयार करणे, गावाला जोडणारा योग्य पोचमार्ग तयार करणे, बांबूच्या माध्यमातून स्थानिक रोजगारनिर्मिती करणे तसेच सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देऊन कृषी तज्ज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध करून देणे, या बाबींचा त्यात समावेश आहे.

सध्या गावातील नागरिकांना पिण्यासाठी आणि दैनंदिन वापरासाठी जवळच्या नाल्यातील पाण्यावर अवलंबून राहावे लागते. गावात वीज वितरणाचे खांबही उभारण्यात आलेले नाहीत. त्यामुळे पाणी आणि वीज या मूलभूत सुविधांना प्राधान्य देण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. तसेच दुर्गम भौगोलिक परिस्थितीमुळे पावसाळ्यात आणि आपत्कालीन वेळी गावापर्यंत पोहोचणे कठीण होत असल्याने रस्त्याची मागणीही महत्त्वाची असल्याचे सांगितले.

गाव परिसरात मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेल्या बांबूचा योग्य वापर करून स्थानिक रोजगार निर्माण करणे, वनहक्क कायद्याच्या तरतुदींनुसार जंगलाचे संवर्धन व व्यवस्थापन करणे आणि स्थानिक परिस्थितीला अनुरूप शाश्वत शेती पद्धती विकसित करणे, यावरही त्यांनी भर दिला.

ग्रामसभेतून स्वराज्य आणि स्वावलंबनाचा मार्ग -
गावाचा विकास केवळ शासकीय निधीवर अवलंबून न राहता ग्रामसभेच्या सामूहिक निर्णयप्रक्रियेतून झाला पाहिजे. गावातील जंगल, बांबू, नैसर्गिक संसाधने, पारंपरिक ज्ञान आणि स्थानिक कौशल्ये हीच आर्थिक स्वावलंबनाची ताकद आहे. त्यांचे संवर्धन व योग्य व्यवस्थापन करून ग्रामसभेने स्वतः गावाच्या विकासाचे नियोजन करावे, असे आवाहन अ‍ॅड. नोगोटी यांनी केले.

२०१६ मध्ये कुमनार गावाला प्रशासकीय नकाशावर आणण्यासाठी प्रयत्न केले; आता गावाला स्वराज्य, स्वावलंबन आणि सर्वांगीण विकासाच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी ग्रामस्थांनी एकत्रितपणे पुढाकार घ्यावा, असे ते म्हणाले. गावकऱ्यांनीही मूलभूत समस्या सोडविण्यासाठी आणि सामूहिक विकासासाठी एकजुटीने प्रयत्न करण्याची भूमिका मांडली.





  Print






Related Photos