महत्वाच्या बातम्या

 एटापल्लीत देशी दारू तस्करीवर पोलिसांचा मोठा प्रहार : २७ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त


- सहा आरोपी अटकेत; तिघे अंधाराचा फायदा घेत जंगलात पसार – दोन चारचाकी वाहने, दारूच्या पेट्या आणि सात मोबाइल पोलिसांच्या ताब्यात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / एटापल्ली : तालुक्यात सुरू असलेल्या देशी दारूच्या अवैध तस्करीविरोधात एटापल्ली पोलिसांनी मोठी धडक कारवाई करत तस्करांचे जाळे उघडकीस आणले आहे. जीवनगट्टा-बारसेवाडा मार्गावर मध्यरात्रीच्या सुमारास पोलिसांनी सापळा रचून दोन चारचाकी वाहनांसह देशी दारूच्या पेट्या आणि सात मोबाइल फोन असा एकूण २७ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत सहा आरोपींना अटक करण्यात आली असून, अन्य तीन आरोपी अंधाराचा फायदा घेत जंगलाच्या दिशेने पसार झाले आहेत. फरार आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.

मध्यरात्री सापळा रचून कारवाई -
मिळालेल्या माहितीनुसार, एटापल्ली परिसरातून मोठ्या प्रमाणात देशी दारूची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी जीवनगट्टा-बारसेवाडा मार्गावर मध्यरात्रीच्या सुमारास सापळा रचला. यावेळी संशयास्पद दोन चारचाकी वाहनांची तपासणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात देशी दारू आढळून आली. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत दोन्ही वाहने आणि त्यातील दारू जप्त केली. एका वाहनातून ९ लाख ७० हजार रुपयांचा, तर दुसऱ्या वाहनातून १६ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. याशिवाय संतोष डोलू नरोटे यांच्या शेतात ९० हजार रुपये किमतीची देशी दारू आढळली. तसेच आरोपींकडून ७० हजार रुपये किमतीचे सात मोबाइल फोनही जप्त करण्यात आले. अशा प्रकारे या संपूर्ण कारवाईत २७ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.

वर्ध्यातील आरोपीकडून तस्करीच्या साखळीचा उलगडा -
या प्रकरणातील आरोपी प्रशांत बजरंग आंबटकर (रा. नंदुरी, ता. समुद्रपूर, जि. वर्धा) याने पंकज शामल बारई याच्या सांगण्यावरून एटापल्ली येथील आकाश मुजुमदार याच्यासाठी देशी दारू आणल्याची कबुली दिल्याची माहिती आहे. त्यामुळे या तस्करीमागील मुख्य सूत्रधार कोण, दारूचा पुरवठा कुठून होत होता आणि या अवैध व्यवसायात आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.

सहा आरोपी अटकेत; तिघे जंगलात पसार -
या कारवाईत पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे. त्यामध्ये आकाश प्रशांत मुजुमदार (रा. एटापल्ली), अफसर शेख हुसेन (रा. नागपूर), प्रशांत बजरंग आंबटकर (रा. वर्धा), पंकज शामल बारई (रा. जांबिया गट्टा), तुषार मिहीर रॉय आणि सुरत सत्यजित मंडल (दोघेही रा. पाखंजूर, छत्तीसगड) यांचा समावेश आहे. दरम्यान, संतोष डोलू नरोटे, मिथुन निर्मल मलिक आणि गौरव प्रभाकर माकोडे हे तिघे अंधाराचा फायदा घेत जंगलाच्या दिशेने पळून जाण्यात यशस्वी झाले. या फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत.

पोलिस पथकाच्या कामगिरीचे कौतुक -
ही धडक कारवाई पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत लांबट यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या मोहिमेत पोलिस शिपाई मोहन शिंदे, प्रवीण वैरागडे, रोशन पुराम, काशिनाथ मोहटे, गणेश सोनटक्के, शिवा हरगिले आणि वासुदेव मडावी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. एटापल्ली परिसरातील अवैध दारू वाहतूक आणि तस्करीविरोधात पोलिसांनी केलेल्या या मोठ्या कारवाईमुळे अवैध दारू विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. या तस्करीचे जाळे किती व्यापक आहे आणि यामागे आणखी कोणाचे हात आहेत, हे तपासातून स्पष्ट होणार आहे.





  Print






Related Photos