पोंभूर्ण्यातील पुलाखाली उतरले की मोबाईल दाखवतो व्हिएतनामचे लोकेशन!

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : जिल्ह्यातील पोंभूर्णा येथे उभे राहून मोबाईलमध्ये व्हिएतनामचे लोकेशन दिसू शकते का? प्रथमदर्शनी हा प्रश्न अविश्वसनीय वाटेल; मात्र पोंभूर्ण्यातील एका पुलाजवळ घडलेल्या प्रकारामुळे हाच प्रश्न उपस्थित झाला आहे. पुलावर उभे राहून फोटो काढल्यास पोंभूर्णा, महाराष्ट्र असे लोकेशन दिसते, तर त्याच पुलाखाली पाण्यात उतरून फोटो काढताच व्हिएतनाममधील हनोईचे लोकेशन दिसत असल्याने विद्यार्थी आणि शिक्षकही चक्रावले आहेत.
पोंभूर्णा येथील चिंतामणी महाविद्यालयाचे विद्यार्थी आक्सापूर मार्गावरील नासण नाल्यावर बंधारा बांधण्याचे काम करीत होते. यावेळी एका विद्यार्थ्याने सहज मोबाईलमध्ये फोटो काढले. फोटोसोबत नोंदविलेल्या लोकेशनकडे लक्ष गेल्यानंतर त्याला आश्चर्याचा धक्का बसला. प्रत्यक्षात पोंभूर्ण्यात असतानाही मोबाईलमध्ये व्हिएतनाममधील लोकेशन दिसत असल्याचे त्याच्या लक्षात आले. त्याने हा प्रकार शिक्षकांना दाखविला.
विद्यार्थ्यांनी सांगितलेल्या प्रकाराची खातरजमा करण्यासाठी चिंतामणी महाविद्यालयाचे प्रा. डॉ. संजय उगेमुगे यांनी घटनास्थळी जाऊन स्वतः प्रयोग केला. ‘जीपीएस मॅप कॅमेरा’ ॲपच्या माध्यमातून त्यांनी पुलावरून आणि पुलाखाली पाण्यात उतरून फोटो काढले. पुलावरून फोटो घेताना लोकेशन पोंभूर्णा, महाराष्ट्र असे अचूक दिसले. मात्र, काही मीटर खाली पाण्यात उतरून फोटो काढताच लोकेशन बदलून फुक थिन्ह, हनोई, व्हिएतनाम असे दिसू लागले. त्यामुळे हा प्रकार केवळ विद्यार्थ्याच्या मोबाईलपुरता मर्यादित आहे की त्यामागे अन्य तांत्रिक कारण आहे, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
जीपीएस तंत्रज्ञानाच्या साहाय्याने मोबाईलमधील लोकेशन निश्चित केले जाते. मात्र, एकाच परिसरात काही मीटरच्या अंतराने दोन वेगवेगळ्या देशांचे लोकेशन दिसण्यामागे नेमके काय कारण असावे, हा चर्चेचा विषय ठरला आहे. जीपीएस सिग्नलमधील अडथळा, ॲपमधील नकाशाची त्रुटी किंवा लोकेशन डेटामधील गोंधळ यामुळे असे घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तथापि, तांत्रिक तपासणीशिवाय यामागील नेमके कारण स्पष्ट होऊ शकणार नाही.
प्रा. डॉ. संजय उगेमुगे यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांनी दाखविलेल्या फोटोंवर सुरुवातीला विश्वास बसला नाही. त्यामुळे स्वतः घटनास्थळी जाऊन पडताळणी केली. पुलावरून अचूक लोकेशन दिसते; मात्र खाली पाण्यात उतरताच काही मीटरच्या अंतराने व्हिएतनाममधील हनोईचे लोकेशन दाखविले जाते. जीपीएस सिग्नलमधील तांत्रिक अडथळा किंवा सॅटेलाइट डेटा मॅपिंगमधील त्रुटीमुळे हा प्रकार घडत असावा. या गोंधळाचे नेमके कारण शोधण्यासाठी तांत्रिक अभ्यास होणे आवश्यक आहे. पोंभूर्ण्यातील या घटनेने आधुनिक तंत्रज्ञानाच्या अचूकतेबाबत प्रश्न निर्माण केला आहे. प्रत्यक्षात महाराष्ट्रात असताना मोबाईलच्या लोकेशनमध्ये थेट व्हिएतनाम दिसत असल्याने या अनोख्या प्रकाराची परिसरात चर्चा रंगली आहे.




Petrol Price




