शेतात काम करताना वाघाचा हल्ला : ६० वर्षीय शेतकऱ्याचा जागीच मृत्यू

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : सिंदेवाही तालुक्यातील पळसगाव जाट येथे शेतात काम करीत असताना वाघाने हल्ला केल्याने ६० वर्षीय शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना २४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास घडली. नानाजी नारायण कामडी असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, नानाजी कामडी हे पळसगाव जाट येथील रहिवासी असून शेती हा त्यांच्या उदरनिर्वाहाचा मुख्य व्यवसाय होता. शनिवारी सायंकाळी ते आपल्या शेतात काम करीत असताना अचानक वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले. घटनेमुळे पळसगाव जाट परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.




Petrol Price




