महत्वाच्या बातम्या

 नवरात्रोत्सवात कष्टकरी महिलेला मदतीचा हात : व्यवसायासाठी मोठी छत्री आणि थंड पाण्याचा जार भेट


विदर्भ न्यूज एक्सप्रेस  
प्रतिनिधी / चंद्रपूर : कडक उन्हाची तमा न बाळगता रस्त्याच्या कडेला पान-फुले आणि पूजेचे साहित्य विकून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या वर्षा गुरुनुले या कष्टकरी महिलेला नवरात्रोत्सवानिमित्त मदतीचा हात देण्यात आला. त्यांच्या व्यवसायातील अडचणी लक्षात घेऊन विकलांग सेवा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेत त्यांना मोठी छत्री आणि थंड पाण्याचा जार भेटस्वरूपात दिला.

चंद्रपूर शहरातील कडक उन्हात दिवसभर बसून व्यवसाय करणाऱ्या वर्षा गुरुनुले यांना उन्हापासून संरक्षण मिळावे, यासाठी मोठ्या छत्रीची आवश्यकता होती. त्यांची ही गरज लक्षात घेऊन आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या माध्यमातून मोठी छत्री उपलब्ध करून देण्यात आली. तसेच महापारेषणचे गुणवंत कामगार पुरस्कारप्राप्त सुरेश तुम्मे यांच्या वतीने थंड पाण्याचा जार भेट देण्यात आला. नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने हा उपक्रम राबविण्यात आला.

रोजच्या उदरनिर्वाहासाठी उन्हातान्हात कष्ट करणाऱ्या महिलेला तिच्या व्यवसायासाठी आवश्यक साहित्य मिळाल्याने तिला मोठा आधार मिळाला आहे. समाजातील गरजू आणि कष्टकरी व्यक्तींच्या अडचणी समजून घेऊन त्यांना मदत करण्याचा हा उपक्रम सामाजिक बांधिलकी जपणारा ठरला.या उपक्रमावेळी शिक्षिका वर्षा लोखंडे, विनोद झाडे, विकलांग सेवा संस्थेचे अध्यक्ष देवराव कोंडेकर, तुम्मे, पूजा पान्हेरकर आणि सीमा दुपारे उपस्थित होते.नवरात्रोत्सवाच्या काळात व्यवसायोपयोगीसाहित्याची भेट मिळाल्याने वर्षा गुरुनुले यांनी आमदार सुधीर मुनगंटीवार तसेच तुम्मे परिवाराचे आभार मानले.





  Print






Related Photos