जिल्ह्यात १८ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबरपर्यंत मनाई आदेश


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : आगामी सण-उत्सव, नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक तसेच संभाव्य आंदोलने व सार्वजनिक कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ च्या कलम ३७ (१) व (३) अन्वये संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात मनाई आदेश जारी केला आहे. हा आदेश १८ ऑक्टोबर २०२६ रोजी पासून १ नोव्हेंबर २०२६ रोजी पर्यंत लागू राहील.
आदेशानुसार शस्त्रे, शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येणाऱ्या वस्तू, दाहक किंवा स्फोटक पदार्थ तसेच दगड व इतर फेकण्याची साधने बाळगण्यास प्रतिबंध आहे. सभ्यता व नीतिमत्तेला बाधा आणणारी किंवा राज्याची सुरक्षितता धोक्यात आणणारी भाषणे, घोषणा तसेच चित्रे, चिन्हे व फलकांचे प्रदर्शन किंवा प्रसार करण्यासही मनाई आहे.
उपविभागीय दंडाधिकारी, कार्यकारी दंडाधिकारी अथवा संबंधित पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय मिरवणूक काढता येणार नाही. तसेच आदेशाच्या कालावधीत सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा अधिक व्यक्तींना एकत्र जमण्यास किंवा कार्यक्रम आयोजित करण्यास मनाई असल्याचे आदेशात नमूद आहे.




Petrol Price




