राँग साइडचा शॉर्टकट जीवावर बेतू शकतो : जेटपुरा गेटवर वाहतूक पोलिसांचा इशारा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : काही क्षणांची घाई, काही मीटरचा शॉर्टकट आणि नियमांकडे केलेले दुर्लक्ष कधी मोठ्या अपघाताला निमंत्रण देईल, सांगता येत नाही. जेटपुरा गेट परिसरातील वाहतूक कोंडी आणि चुकीच्या दिशेने वाहन चालविण्याच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने आता राँग साइड प्रवेश रोखण्यासाठी स्पाईक बॅरिअर (राँग साइड कटर) बसविले आहेत. त्यामुळे विरुद्ध दिशेने वाहन घेऊन जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या वाहनचालकांचे टायर पंक्चर होऊन वाहनाचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
जेटपुरा गेट परिसरात अनेकदा वाहनचालक घाईच्या नादात किंवा वाहतूक कोंडी टाळण्यासाठी शॉर्टकटचा मार्ग स्वीकारतात. मात्र, राँग साइडने वाहन चालविण्याचा हा प्रकार स्वतःच्या जीवासोबतच समोरून येणाऱ्या वाहनचालकांच्या सुरक्षेलाही धोका निर्माण करणारा ठरू शकतो. अशा प्रकारांना प्रतिबंध घालण्यासाठी प्रशासनाने हे स्पाईक बॅरिअर कार्यान्वित केले आहेत.
वाहनचालकांनी कटर बसविलेल्या भागातून चुकीच्या दिशेने वाहन नेऊ नये, असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे. विरुद्ध दिशेने वाहन नेल्यास स्पाईक्समुळे वाहनांचे टायर तत्काळ पंक्चर अथवा फाटू शकतात आणि वाहनाचे मोठे नुकसान होऊ शकते. मात्र, वाहतुकीच्या योग्य दिशेने जाणाऱ्या वाहनांना या कटरचा कोणताही त्रास होणार नाही.
राँग साइडने वाहन चालविणे केवळ वाहतूक नियमांचे उल्लंघन नसून स्वतःसह इतर निष्पाप वाहनचालकांचा जीव धोक्यात घालणारा प्रकार आहे. त्यामुळे काही क्षण वाचविण्याच्या प्रयत्नात मोठी दुर्घटना घडण्यापेक्षा वाहनचालकांनी संयम बाळगून वाहतूक नियमांचे पालन करावे, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
राँग साइडने वाहन चालविणाऱ्यांना कटरमुळे होणाऱ्या संभाव्य नुकसानीसोबतच वाहतूक नियमांनुसार कायदेशीर आणि दंडात्मक कारवाईलाही सामोरे जावे लागू शकते. नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत वाहतूक व्यवस्था अधिक शिस्तबद्ध करण्यासाठी हा उपाय करण्यात आला आहे.
त्यामुळे वाहनचालकांनी रस्त्यावरील दिशादर्शक फलकांकडे लक्ष देऊनच वाहन चालवावे, चुकीच्या दिशेने जाण्याचा मोह टाळावा आणि वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. कारण काही मिनिटांची घाई टाळता येते; मात्र चुकीच्या दिशेने घेतलेला एक निर्णय आयुष्यभराची हानी करून जाऊ शकतो.




Petrol Price




