अल निनोच्या सावटात चंद्रपूरच्या पाण्याचे नियोजन : १६ ऑक्टोबरपासून १० टक्के कपात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : अल निनोच्या संभाव्य प्रभावामुळे आगामी काळात पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन चंद्रपूर महानगरपालिका प्रशासनाने आतापासूनच पाणी व्यवस्थापनाला वेग दिला आहे. उपलब्ध जलसाठा अधिक काळ टिकवून ठेवण्यासाठी १६ ऑक्टोबरपासून किमान १० टक्के पाणी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर पाणीगळती रोखणे, नळांना टोट्या बसविणे आणि औद्योगिक वापरासाठी पुनर्वापरित पाण्याचा वापर वाढविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
चंद्रपूर शहरातील पाणीपुरवठ्याच्या नियोजनासाठी महानगरपालिकेत बुधवारी उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली. जलसंपदा विभागाच्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने झालेल्या या बैठकीत शहराला उपलब्ध जलसाठा आणि भविष्यातील पाण्याची गरज यांचा आढावा घेण्यात आला. संभाव्य टंचाईची परिस्थिती निर्माण झाल्यास नागरिकांना कमीतकमी अडचणींचा सामना करावा लागावा, यासाठी आतापासूनच नियोजन करण्यावर भर देण्यात आला.
बैठकीत उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासोबतच पाणी वितरण व्यवस्थेतील अपव्यय कमी करण्यावर चर्चा झाली. शहरातील पाणीगळतीची ठिकाणे शोधून तातडीने दुरुस्ती करण्याचे आदेश देण्यात आले. तसेच आवश्यकतेनुसार सर्व नळांना टोट्या बसविण्याची कार्यवाही करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या.
पाणी कपातीच्या निर्णयानुसार १६ ऑक्टोबरपासून किमान १० टक्के पाणी कमी प्रमाणात उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. या कपातीची अंमलबजावणी कशा पद्धतीने करावी, त्याचा शहरातील पाणीपुरवठ्यावर काय परिणाम होईल आणि नागरिकांना कोणत्या पद्धतीने पाणी उपलब्ध करून द्यावे, याचा सविस्तर अहवाल तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
औद्योगिक क्षेत्रासाठी वापरल्या जाणाऱ्या पिण्याच्या पाण्यामुळे शहराच्या जलसाठ्यावर येणारा ताण कमी करण्यासाठी महानिर्मितीला पुनर्वापरित पाण्याचा वापर वाढविण्याच्या सूचना देण्यात आल्या. महानिर्मितीकडून वॉटर रिसायकलिंगचे काम सुरू असून पुनर्वापरित पाण्याचा वापर केला जात असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी बैठकीत दिली.
दरम्यान, पाणी बचतीसाठी नागरिकांनीही पुढाकार घेण्याची गरज प्रशासनाने व्यक्त केली आहे. घरगुती वापरात पाण्याचा अनावश्यक अपव्यय टाळणे, नळ सुरू ठेवून पाणी वाया जाऊ न देणे आणि उपलब्ध पाण्याचा जपून वापर करणे, या बाबींकडे नागरिकांनी गांभीर्याने पाहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
शहरात पाणी बचतीबाबत व्यापक जनजागृती करण्याचेही नियोजन करण्यात आले आहे. शाळा-महाविद्यालये, सामाजिक संस्था आणि विविध जनजागृती कार्यक्रमांच्या माध्यमातून नागरिकांना पाणी बचतीचे महत्त्व पटवून देण्यात येणार आहे.
या बैठकीला महानगरपालिका आयुक्तांसह चंद्रपूर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता, महानिर्मितीचे उपमुख्य अभियंता व अधीक्षक अभियंता, मनपाचे शहर अभियंता, कार्यकारी अभियंता तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.
अल निनोच्या पार्श्वभूमीवर संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी प्रशासनाने नियोजन सुरू केले असले तरी या प्रयत्नांना नागरिकांच्या सहकार्याची जोड मिळणे आवश्यक आहे. पाणीटंचाईचे संकट टाळण्यासाठी आजपासूनच पाण्याची बचत करण्याचे आवाहन मनपा प्रशासनाने केले आहे.




Petrol Price




