महत्वाच्या बातम्या

 आरोग्याचा डोस मिळणार आता गावच्या दारात


- पाटाळा डोंगरगावात नवीन उपकेंद्रांचे लोकार्पण , ५७ हजारांहून अधिक नागरिकांना मिळणार आरोग्यसेवा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : ग्रामीण भागातील गरीब आणि गरजू नागरिकांना त्यांच्या जवळच तत्पर व दर्जेदार वैद्यकीय सेवा उपलब्ध व्हावी, यासाठी पाटाळा आणि डोंगरगाव येथे नवीन आरोग्य उपकेंद्रे उभारण्यात आली आहेत. आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक वुईके यांच्या हस्ते शनिवारी १५ या दोन्ही उपकेंद्रांचे लोकार्पण करण्यात आले.

पाटाळा येथे ८२ लाख ५२ हजार रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या उपकेंद्रामुळे राळेगाव, मनगाव, थोराणा, कुचना, नागलोण आणि कावडी परिसरातील तब्बल ५५ हजार नागरिकांना १३ प्रकारच्या आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहेत. तर डोंगरगाव येथे ५४ लाख ६२ हजार रुपये खर्चून साकारलेल्या उपकेंद्राचा डोंगरगाव, खापरी, टाकळी आणि निमसडा परिसरातील सुमारे २ हजार ७०० नागरिकांना थेट लाभ मिळणार आहे.  

लोकार्पणानंतर पालकमंत्री डॉ. अशोक वुईके यांनी उपकेंद्रातील नोंदणी कक्ष, तपासणी कक्ष, महिला आंतररुग्ण कक्ष, औषधसाठा गृह आणि प्रसूती कक्षाची पाहणी केली. आरोग्य केंद्रात दैनंदिन बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी), मासिक प्रसूती आणि औषधसाठ्याची अचूक नोंद ठेवण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

औषधे उपलब्ध नाहीत अशी तक्रार येता कामा नये -

रुग्णांना आवश्यक औषधे वेळेवर मिळावीत यासाठी औषधांच्या निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी यावेळी दिली. तसेच प्रधानमंत्री आयुष्मान भारत योजना, महात्मा फुले जनआरोग्य योजना आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी यांसारख्या योजनांची माहिती नागरिकांना सहज उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी केल्या. केंद्राच्या दर्शनी भागात उपलब्ध आरोग्य योजना, पॅनलवरील रुग्णालयांची यादी तसेच आवश्यक कागदपत्रांची माहिती लावण्याचे निर्देशही पालकमंत्र्यांनी दिले.

यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार करण देवतळे, जिल्हाधिकारी वसुमना पंत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, उपविभागीय अधिकारी संदीप भस्के, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बंडू रामटेके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, स्थानिक सरपंच, तहसीलदार, आरोग्य विभागाचे अधिकारी-कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





  Print






Related Photos