मतदान केंद्र परिसरात कलम १६३ लागू जिल्हाधिकारी सावन कुमार यांचे आदेश

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या द्वैवार्षिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात शांततापूर्ण, मुक्त व निर्भय वातावरणात मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या आहेत. जिल्हाधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सावन कुमार यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ मधील कलम १६३ अन्वये जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांच्या २०० मीटर परिसरात विशेष मनाई आदेश लागू केले आहेत.
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार निवडणूक आचारसंहिता लागू झाली असून, २३ ऑक्टोबर २०२६ रोजी मतदान आणि २७ ऑक्टोबर २०२६ रोजी मतमोजणी होणार आहे. मतदानाच्या दिवशी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये तसेच कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी भंडारा-६१, तुमसर-६० आणि साकोली-६२ विधानसभा क्षेत्रातील मतदान केंद्रांच्या २०० मीटर परिसरात विविध निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
मतदान केंद्रापासून २०० मीटर परिसरात कोणत्याही प्रकारचा निवडणूक प्रचार करणे, मतदारांकडे मते मागणे अथवा विशिष्ट उमेदवारास मतदान न करण्याबाबत मतदारांचे मन वळविण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच मतदान केंद्र परिसरात किंवा बाहेरील ठिकाणाहून मानवी आवाजाचे वर्धन करणाऱ्या ध्वनिवर्धकांचा वापर करता येणार नाही.
मतदान केंद्राच्या २०० मीटर परिसरात विनापरवाना वाहने आणण्यासही प्रतिबंध करण्यात आला आहे. मतदारांची अनधिकृतपणे ने-आण केल्यास लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५१ मधील कलम १३३ अन्वये कारवाई करण्यात येईल. तसेच मतदान केंद्राच्या २०० मीटर परिसरात हॉटेल, टेलिफोन बूथ, झेरॉक्स सेंटर, फेरीवाले आदींना व्यवसाय करता येणार नाही. उमेदवारांचे प्रतिनिधी व कार्यकर्त्यांसाठी मंडप, टेबल, खुर्च्या आदी लावण्यासही सक्त मनाई करण्यात आली आहे.
हा मनाई आदेश २१ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजेपासून २३ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत लागू राहणार आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील तरतुदींनुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
निवडणूक कर्तव्यावरील अधिकारी व कर्मचारी तसेच कायदा व सुव्यवस्थेसाठी तैनात पोलीस अधिकारी यांना या आदेशातून वगळण्यात आले आहे. तसेच अंत्ययात्रा, विवाह सोहळे व धार्मिक मिरवणुकांनाही आदेशातून अपवाद देण्यात आला आहे. स्थानिक स्तरावरील सभा व मिरवणुका काढण्यासाठी संबंधित उपविभागीय दंडाधिकारी किंवा तालुका दंडाधिकारी यांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहणार आहे.




Petrol Price




