रेती तस्करांवर पोलिसांची धडक कारवाई


- दोन ट्रॅक्टर-ट्रॉलीसह १४ लाख १४ हजारांचा मुद्देमाल जप्त; दिघी-देवळी मार्गावर पहाटे दोन स्वतंत्र कारवाया
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : परिसरात बेकायदेशीररीत्या सुरू असलेल्या रेती उत्खनन आणि विनापरवाना वाहतुकीविरोधात देवळी पोलिसांनी धडक मोहीम राबवित दोन स्वतंत्र कारवाया केल्या. दिघी ते देवळी मार्गावर रविवारी ४ पहाटे करण्यात आलेल्या या कारवाईत रेतीची विनापरवाना वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर-ट्रॉली आणि प्रत्येकी एक ब्रास काळी ओलसर रेती असा एकूण १४ लाख १४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी दोन चालकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.मयूर भास्कर मोहेकर २७ वर्ष , रा. वॉर्ड क्र. ३ आणि मंगेश विजय तायवाडे ३३ वर्ष, रा. वॉर्ड क्र. १० अशी गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तींची नावे आहेत.
नाकाबंदीत पहिला ट्रॅक्टर पकडला -
४ ऑक्टोबर रोजी पहाटेच्या सुमारास दिघी-देवळी मार्गावर देवळी पोलिसांनी नाकाबंदी केली होती. या वेळी संशयास्पद वाहनांची तपासणी करण्यात येत होती. दरम्यान, मयूर भास्कर मोहेकर हा कोणताही शासकीय परवाना किंवा अधिकृत परवानगी नसताना ट्रॅक्टरमधून रेतीची वाहतूक करताना पोलिसांच्या निदर्शनास आला.
पोलिसांनी ट्रॅक्टरची तपासणी केली असता त्यामध्ये एक ब्रास काळी ओलसर रेती आढळून आली. पोलिसांनी रेतीसह विना क्रमांकाचा लाल रंगाचा ट्रॅक्टर आणि ट्रॉली असा एकूण ७ लाख ७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
दुसऱ्या कारवाईतही रेतीसह ट्रॅक्टर जप्त -
याच मार्गावर पोलिसांनी केलेल्या दुसऱ्या कारवाईत मंगेश विजय तायवाडे हा विनापरवाना ट्रॅक्टर-ट्रॉलीमधून रेतीची वाहतूक करताना आढळून आला. त्याच्या ताब्यातील वाहनाची तपासणी केली असता त्यामध्येही एक ब्रास काळी ओलसर रेती असल्याचे आढळले. या कारवाईत पोलिसांनी रेतीसह विना क्रमांकाचा ट्रॅक्टर आणि ट्रॉली असा ७ लाख ७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दोन्ही कारवायांमध्ये जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत १४ लाख १४ हजार रुपये आहे.
पहाटेच्या कारवाईने रेती तस्करांमध्ये खळबळ -
अंधाराचा फायदा घेत रेतीची चोरी करून तिची विनापरवाना वाहतूक केली जात असल्याची शक्यता लक्षात घेऊन देवळी पोलिसांनी पहाटेच्या वेळी नाकाबंदी केली होती. या कारवाईमुळे अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. रेती उत्खनन आणि वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांकडून यापुढेही अशाच प्रकारच्या कारवाया केल्या जाण्याची शक्यता आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई -
ही कारवाई पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, अपर पोलिस अधीक्षक सदाशिव वाघमारे आणि उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. वंदना कारखिले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.देवळी पोलीस ठाण्याचे ठाणेदार संदीप कापडे यांच्या नेतृत्वाखाली हवालदार अमोल आलवाळकर, श्याम गावनेर, संतोष गिते आणि आकाश कसार यांनी ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली. याप्रकरणी दोन्ही चालकांविरुद्ध संबंधित कायदेशीर तरतुदींनुसार गुन्हे दाखल करण्यात आले असून, पुढील तपास देवळी पोलिसांकडून सुरू आहे.




Petrol Price




