महत्वाच्या बातम्या

 सेवा संकल्प अभियानांतर्गत टेकला येथे विशेष स्वच्छता मोहीम


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / भामरागड : सेवा संकल्प अभियानांतर्गत टेकला ग्रामपंचायत कार्यालय परिसरात गुरुवारी सकाळी ९ वाजता विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. ग्रामपंचायत परिसर तसेच आजूबाजूच्या भागात स्वच्छता करून परिसर स्वच्छ व निरोगी ठेवण्याबाबत ग्रामस्थांमध्ये जनजागृती करण्यात आली. ग्रामपंचायत प्रशासनाच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या या स्वच्छता मोहिमेत ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

मोहिमेदरम्यान ग्रामपंचायत कार्यालय परिसर, सार्वजनिक ठिकाणे तसेच परिसरातील इतर भागाची स्वच्छता करण्यात आली. कचरा संकलित करून परिसर स्वच्छ करण्यात आला. यावेळी स्वच्छतेचे महत्त्व, सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकणे आणि परिसर स्वच्छ ठेवण्याची सामूहिक जबाबदारी याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले.

या स्वच्छता मोहिमेत उपसरपंच बुकलु लेकामी, ग्रामपंचायत अधिकारी व्ही. पी. वेलादी, अंगणवाडी सेविका सीता पुंगाटी, मंगला दुर्वा, आशा वर्कर जया दुर्वा, सगुणा दुर्वा, अनिता एक्का तसेच पांडू बोगामी, किशोर दुर्वा, मुंशी बोगामी, सम्मा कुळयेटी, वंजा कोवासी यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले.

यावेळी उपस्थितांनी स्वच्छता ही केवळ एखाद्या अभियानापुरती मर्यादित न राहता ती नियमितपणे जपली गेली पाहिजे, असे आवाहन केले. गावातील सार्वजनिक परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपली जबाबदारी पार पाडण्याची गरजही व्यक्त करण्यात आली.

सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे ग्रामस्थांमध्ये स्वच्छतेविषयी जागरूकता निर्माण झाली असून, ग्रामपंचायत परिसर स्वच्छ ठेवण्याच्या दृष्टीने मोहिमेला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.





  Print






Related Photos