पोमकें घोट हद्दीतील अत्यंत क्लिष्ट खून प्रकरणाची गडचिरोली पोलिसांकडून उकल : आरोपी जेरबंद


- जखमांच्या बारकाईने केलेल्या निरीक्षणातून तपासाला मिळाली दिशा; तांत्रिक पुरावे व गोपनीय माहितीच्या आधारे संशयिताला अटक
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : पोलीस मदत केंद्र घोटच्या हद्दीतील नारायणपूर येथे ६० वर्षीय महिलेच्या झालेल्या खुनाच्या अत्यंत क्लिष्ट व गंभीर गुन्ह्याची गडचिरोली पोलिसांनी यशस्वी उकल केली आहे. मृतदेहावरील जखमांचे बारकाईने निरीक्षण, तांत्रिक पुरावे, मृत महिलेचे कौटुंबिक संबंध तसेच गोपनीय माहितीच्या आधारे तपासाची दिशा निश्चित करून पोलिसांनी संदीप रावजी टेकाम (वय ३५), रा. नारायणपूर चक क्रमांक २, ता. चामोर्शी, जि. गडचिरोली याला अटक केली आहे. आरोपीला न्यायालयासमोर हजर केले असता चार दिवसांचा पोलीस कोठडी रिमांड मंजूर करण्यात आला आहे.
शेतात आढळला महिलेचा मृतदेह -
५ सप्टेंबर २०२६ रोजी नारायणपूर, ता. चामोर्शी येथील गोपीकाबाई रामचंद्र गायकवाड (वय ६०) या नेहमीप्रमाणे शेतात गेल्या होत्या. मात्र, संध्याकाळपर्यंत त्या घरी परतल्या नाहीत. त्यामुळे त्यांच्या नातेवाईकांनी व ग्रामस्थांनी शेत परिसरात शोध घेतला. यावेळी गोपीकाबाई गायकवाड यांचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी चामोर्शी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४६०/२०२६, भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम १०३(१) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
घटना गंभीर स्वरूपाची असून आरोपी अज्ञात असल्याने त्याचा शोध घेऊन त्याला जेरबंद करणे हे गडचिरोली पोलिसांसमोर मोठे आव्हान होते.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाला वेग -
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत आवश्यक सूचना दिल्या. पोलीस अधीक्षक एम. रमेश आणि अपर पोलीस अधीक्षक गोकुल राज जी. यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे वेगाने फिरविण्यात आली.
गुन्ह्याची उकल करून आरोपीला अटक करण्यासाठी सहा. पोलीस अधीक्षक अनिकेत हिरडे यांच्या नेतृत्वाखाली पोमकें घोट आणि स्थानिक गुन्हे शाखा, गडचिरोली येथील अधिकारी व अंमलदारांची स्वतंत्र तपास पथके तयार करण्यात आली.
जखमांच्या निरीक्षणातून मिळाली महत्त्वाची दिशा -
गुन्ह्याच्या तपासाच्या सुरुवातीला पोलिसांकडे आरोपीविरुद्ध थेट पुरावे उपलब्ध नव्हते. अशा परिस्थितीत सहा. पोलीस अधीक्षक अनिकेत हिरडे यांनी मृतदेहावरील जखमांचे बारकाईने निरीक्षण केले. जखमांची स्थिती व स्वरूप लक्षात घेऊन हल्लेखोर डावखुरा असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.
या निरीक्षणामुळे तपासाला एक महत्त्वाची दिशा मिळाली. त्यानंतर तपास पथकांनी विविध अंगांनी तपास सुरू केला. मृत महिलेचे कौटुंबिक व सामाजिक संबंध, पूर्वीचे वाद, परिसरातील संशयित व्यक्ती, तांत्रिक पुरावे तसेच गोपनीय माहिती यांचा सखोल अभ्यास करण्यात आला.
तांत्रिक पुरावे व गोपनीय माहितीच्या आधारे संशयित ताब्यात -
तपासादरम्यान पोलिसांना मिळालेल्या तांत्रिक पुराव्यांचे विश्लेषण तसेच गोपनीय माहितीच्या आधारे संदीप टेकाम याच्यावर संशय बळावला. त्यानंतर तपास पथकाने त्याला ताब्यात घेऊन गुन्ह्याच्या अनुषंगाने सखोल चौकशी केली.
पोलिसांच्या तपासानुसार, पूर्वीचे वैमनस्य आणि जुन्या वादातून संदीप टेकाम याने गोपीका गायकवाड यांच्यावर काठीने हल्ला केला आणि त्यानंतर दगडाने मारहाण केल्याचे निष्पन्न झाले. या हल्ल्यात गोपीकाबाई यांचा मृत्यू झाल्याचे तपासात समोर आले.
त्यानंतर पोलिसांनी २९ सप्टेंबर २०२६ रोजी संदीप रावजी टेकाम याला अटक केली.
चार दिवसांची पोलीस कोठडी -
अटकेनंतर आरोपी संदीप टेकाम याला प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी, चामोर्शी यांच्या न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपीला चार दिवसांचा पोलीस कोठडी रिमांड मंजूर केला आहे.
या कालावधीत गुन्ह्यातील इतर बाबी, घटनेची पार्श्वभूमी, वापरण्यात आलेली साधने तसेच गुन्ह्याशी संबंधित अन्य पुराव्यांचा तपास केला जाणार आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहा. पोलीस अधीक्षक अनिकेत हिरडे करीत आहेत.
स्थानिक गुन्हे शाखा व घोट पोलिसांची संयुक्त कामगिरी -
अत्यंत क्लिष्ट स्वरूपाच्या या गुन्ह्यात सुरुवातीला ठोस पुरावे उपलब्ध नसतानाही मृतदेहावरील जखमांचे निरीक्षण, तांत्रिक पुरावे आणि गोपनीय माहिती यांच्या आधारे संशयितापर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश आले. स्थानिक गुन्हे शाखा आणि पोमकें घोट येथील तपास पथकांनी समन्वयाने केलेल्या कारवाईमुळे या खून प्रकरणाचा तपास महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचला आहे.
पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक -
ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या आदेशाने, अपर पोलीस अधीक्षक गोकुल राज जी. यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहा. पोलीस अधीक्षक अनिकेत हिरडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण फेगडे, सपोनि. भगतसिंग दुलत, सपोनि. आगलावे, पोमकें घोटचे सपोनि. कल्पेश खारोडे, पोलीस ठाणे रेगडीचे सपोनि. गवळी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि. विश्वा कराळे तसेच इतर पोलीस अधिकारी व अंमलदार सहभागी झाले होते.
या गंभीर व क्लिष्ट खून प्रकरणाची उकल करून आरोपीला अटक केल्याबद्दल पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी सहा. पोलीस अधीक्षक अनिकेत हिरडे यांच्या नेतृत्वाखालील स्थानिक गुन्हे शाखा आणि पोमकें घोटच्या अधिकारी व अंमलदारांचे कौतुक केले आहे.




Petrol Price




