सेवा संकल्प अभियानांतर्गत भामरागडात ई-केवायसीसाठी विशेष शिबिर


- २८ ते ३० सप्टेंबरदरम्यान ९,५४७ शिल्लक लाभार्थ्यांची ई-केवायसी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / भामरागड : शासनाच्या वतीने १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राज्यभर सेवा संकल्प अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत भामरागड तालुक्यात सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील शिल्लक लाभार्थ्यांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी २८ ते ३० सप्टेंबर या तीन दिवसांत विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
भामरागड तालुक्यात एकूण ५० रास्त भाव दुकाने असून, या दुकानांशी संबंधित अद्याप ९ हजार ५४७ लाभार्थ्यांची ई-केवायसी प्रक्रिया शिल्लक आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित रास्त भाव दुकानांवर विशेष शिबिर घेऊन जास्तीत जास्त लाभार्थ्यांची ई-केवायसी पूर्ण करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.
जवळच्या स्वस्त धान्य दुकानात ई-केवायसी करण्याचे आवाहन -
तालुक्यातील ज्या पात्र लाभार्थ्यांची ई-केवायसी अद्याप पूर्ण झालेली नाही, त्यांनी आपल्या जवळच्या रास्त भाव दुकानात (स्वस्त धान्य दुकानात) जाऊन निर्धारित कालावधीत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन भामरागडचे तहसीलदार किशोर बागडे यांनी केले आहे.
ई-केवायसी पूर्ण झाल्यामुळे पात्र लाभार्थ्यांना सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत मिळणाऱ्या शासकीय धान्याचा लाभ घेण्याची प्रक्रिया अधिक सुलभ होणार आहे. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांनी विलंब न करता या विशेष शिबिराचा लाभ घ्यावा, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
९,५४७ लाभार्थ्यांची ई-केवायसी पूर्ण करण्याचे आव्हान -
भामरागडसारख्या दुर्गम व आदिवासीबहुल तालुक्यात सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा लाभ मोठ्या संख्येने नागरिक घेतात. त्यामुळे शिल्लक असलेल्या ९,५४७ लाभार्थ्यांची ई-केवायसी पूर्ण करणे हे प्रशासनासमोरील महत्त्वाचे काम आहे. विशेष शिबिराच्या माध्यमातून लाभार्थ्यांना त्यांच्या गावाजवळच ही प्रक्रिया पूर्ण करून घेण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
कोणताही पात्र लाभार्थी ई-केवायसीअभावी शासकीय धान्याच्या लाभापासून वंचित राहू नये, यासाठी संबंधित लाभार्थ्यांनी २८, २९ आणि ३० सप्टेंबर या तीन दिवसांत आपल्या संबंधित रास्त भाव दुकानाला भेट देऊन प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
अडचणी असल्यास अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन -
ई-केवायसी करताना लाभार्थ्यांना कोणत्याही प्रकारची अडचण अथवा तांत्रिक समस्या निर्माण झाल्यास संबंधितांनी प्रशासनाशी संपर्क साधावा. यासाठी पुरवठा अधिकारी सचिन वानखेडे तसेच पुरवठा निरीक्षक अस्मिता नैताम यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सेवा संकल्प अभियानअंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या या विशेष शिबिराचा लाभ घेऊन भामरागड तालुक्यातील सर्व पात्र लाभार्थ्यांनी आपली ई-केवायसी प्रक्रिया वेळेत पूर्ण करून घ्यावी, असे प्रशासनाने कळविले आहे.




Petrol Price




