महत्वाच्या बातम्या

 जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत समाज कल्याण विभागाच्या निवासी शाळांचे यश


- ७४ विद्यार्थी विभागस्तरीय स्पर्धांसाठी पात्र; बेसबॉल व सॉफ्टबॉलचे सहा विद्यार्थी राज्यस्तरीय स्पर्धेसाठी अहिल्यानगरला रवाना

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये समाज कल्याण विभागाच्या निवासी शाळांतील तब्बल ७४ विद्यार्थी विभागस्तरीय स्पर्धांसाठी पात्र ठरले आहेत. याशिवाय बेसबॉल व सॉफ्टबॉल फेडरेशनच्या जिल्हास्तरीय स्पर्धेतून सहा विद्यार्थ्यांची थेट राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

विभागस्तरीय स्पर्धांसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांमध्ये किक बॉक्सिंगचे १९, आट्यापाट्यांचे ३६, बॉक्सिंगचे पाच, वुशूचे पाच, कुस्तीचे आठ आणि टेबल टेनिसचा एक विद्यार्थी आहे. उर्वरित स्पर्धांसाठीही विद्यार्थ्यांची तयारी सुरू आहे.

बेसबॉलमधील तीन आणि सॉफ्टबॉलमधील तीन विद्यार्थी राज्यस्तरीय स्पर्धेसाठी आज अहिल्यानगरकडे रवाना झाले. ही स्पर्धा उद्या, २७ सप्टेंबरपासून अहिल्यानगर येथे सुरू होणार आहे. बेसबॉलसाठी जतीन दुर्गे, सक्षम लोणारे आणि शामेख टेंभुर्णे यांची निवड झाली आहे. तर सॉफ्टबॉलसाठी सार्थक गेडाम, सानिध्य डोंगरे आणि संचित नैताम हे तीन विद्यार्थी पात्र ठरले आहेत.

विद्यार्थ्यांच्या तयारीसाठी निवासी शाळांच्या मुख्याध्यापिका प्रियांका डांगेवार, मुख्याध्यापक धारेद्र अंबिलकर तसेच क्रीडा शिक्षक यश पडेलवार, तृप्ती पागे आणि स्वप्निल मडावी यांनी विशेष परिश्रम घेतले.

ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना नियमित सराव आणि स्पर्धांमध्ये सहभागाची संधी मिळावी, यासाठी विभाग प्रयत्नशील आहे. विद्यार्थ्यांना उच्चस्तरीय स्पर्धांसाठी तयार करणे आणि पात्र विद्यार्थ्यांना नोकरीसाठी क्रीडा प्रवर्गातील संधींचा लाभ मिळण्यासाठी मार्गदर्शन करणे, हे उद्दिष्ट असल्याचे समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त डॉ. सचिन मडावी यांनी सांगितले.





  Print






Related Photos