राजुरा येथे २८ सप्टेंबरला काँग्रेसचा भव्य जनआक्रोश मोर्चा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : शेतकरी, शेतमजूर, महिला, युवक, विद्यार्थी, बेरोजगार आणि सर्वसामान्य नागरिकांच्या विविध प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेसच्या वतीने सोमवार, २८ सप्टेंबर रोजी राजुरा येथे भव्य जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार सुभाष धोटे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात येणार असून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते हणमंत पवार, विरोधी पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
सोमवारी सकाळी १० वाजता भवानी माता मंदिर येथून मोर्चाला सुरुवात होणार असून तहसील कार्यालयावर मोर्चा धडकणार आहे. यावेळी विविध जनहिताच्या मागण्यांसाठी शासनाचे लक्ष वेधण्यात येणार आहे. संपूर्ण राज्यात दुष्काळ जाहीर करून राजुरा विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांना तातडीने पीक नुकसानभरपाई व कर्जमाफी द्यावी, शेतमालाला कायदेशीर हमीभाव मिळावा, खते व बियाण्यांचा काळाबाजार थांबवावा, जिवतीतील सातबारा व फार्मर आयडीचे प्रश्न सोडवावेत, तसेच शेतकऱ्यांना अखंडित वीजपुरवठा करावा, अशा मागण्या काँग्रेसने केल्या आहेत.
लाडकी बहीण योजनेचे पोर्टल सुरू करून पात्र महिलांना योजनेचा लाभ द्यावा, नवीन नोंदणी सुरू करावी, महिलांवर एनसीएमसी कार्डची सक्ती करू नये, निराधारांना नियमित दरमहा आर्थिक मदत द्यावी, तसेच स्मार्ट मीटरच्या नावाखाली ग्राहकांवर होणारा अतिरिक्त आर्थिक भार थांबवावा, अशी मागणीही करण्यात आली आहे.
ग्रामीण व शहरी भागातील खराब रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी, घरकुल व सामाजिक सुरक्षा योजनांचे प्रलंबित लाभ मिळवून द्यावेत, पेपरफुटीला आळा घालावा, स्थानिक बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात, गॅस, पेट्रोल, डिझेल आणि जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतींपासून नागरिकांना दिलासा द्यावा, अशा मागण्याही मोर्चाच्या माध्यमातून मांडण्यात येणार आहेत. जातनिहाय जनगणनेत ओबीसी समाजाची स्वतंत्र नोंद करावी आणि ओबीसी, एससी व एसटी समाजाचा निधी अन्य कामांसाठी खर्च करू नये, अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आली आहे.
दरम्यान, मतदार याद्यांमधील कथित फेरबदलाच्या मुद्द्यावरूनही काँग्रेसने आंदोलनाची भूमिका घेतली आहे. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ‘वोट चोरी’च्या मुद्द्यावरून निवडणूक प्रक्रियेबाबत प्रश्न उपस्थित केले असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कार्यपद्धतीबाबत काँग्रेसने आक्षेप नोंदविले असून त्यांच्यावर कारवाई करण्याची तसेच त्यांच्या कार्यकाळातील मतदार याद्यांमधील फेरबदलाची स्वतंत्र समीक्षा करण्याची मागणी करण्यात येणार आहे.
या विविध प्रश्नांवर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी होणाऱ्या जनआक्रोश मोर्चात शेतकरी, महिला, युवक, विद्यार्थी, कामगार आणि सर्वसामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन राजुरा विधानसभा काँग्रेसच्या वतीने करण्यात आले आहे.




Petrol Price




