महत्वाच्या बातम्या

 हिंगणघाट येथे शालेय पोषण आहार विषयावर कार्यशाळा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : शाळांमध्ये सुरक्षित व पौष्टिक अन्न उपलब्ध करुन देणे आणि विद्यार्थ्यांमध्ये संतुलित आहाराच्या सवयी विकसित करण्यासाठी अन्न व औषधी प्रशासन कार्यालय व शिक्षण विभाग, पंचायत समिती हिंगणघाट यांच्या संयुक्त विद्यमाने हिंगणघाट येथे पीएम पोषण आहार योजनेंतर्गत वितरीत होणाऱ्या अन्न पदार्थ्यांच्या संदर्भात माहिती देण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

जी.वी.एम.एम. हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय हिंगणघाट येथे तालुक्यातील मुख्याध्यापक, नोडल अधिकारी, केंद्रप्रमुख तसेच संबंधित व्यक्ती यांच्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेस प्रमुख मार्गदर्शक म्हणुन अन्न व औषध प्रशासनचे सहाय्यक आयुक्त प्रफुल टोपले, गट शिक्षणाधिकारी सुभाष टाकळे, अन्न सुरक्षा अधिकारी पियुष मानवतकर, हुमागौरी पिंपरे यांची  उपस्थिती होती.

शाळांमध्ये सुरक्षित व पौष्टिक अन्न उपलब्ध करुन देणे आणि विद्यार्थ्यांमध्ये संतुलित आहाराच्या सवयी विकसित करणे या उद्देशाने अन्न सुरक्षा व मानदे शालेय विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित अन्न व पौष्टिक आहार नियमन २०२० लागू करण्यात आला आहे. त्याअनुषंगाने राज्यव्यापी शालेय अन्न सुरक्षा अनुपालन आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत. या आदेशाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी जिल्ह्यातील तालुका स्तरावर कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहेत.

कार्यशाळेला हिंगणघाट तालुक्यातील पीएम पोषण आहार योजना अंतर्गत अन्न सेवा पुरविणाऱ्या एकुण १७३ शाळांचे मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख व नोडल अधिकारी उपस्थित होते. कार्यशाळेला पियुष मानवतकर व हुमागौरी पिंपरे यांनी अन्न सुरक्षा व मानदे नियमनामधील तरतुदी बाबत मार्गदर्शन केले. मध्यान्ह भोजन योजनेंतर्गत सेवा पुरविणाऱ्या संस्था, शाळा, कंत्राटदार यांनी परवाना व नोंदणी घेणे बंधनकारक असुन ते पुरवित असलेल्या भोजनाची गुणवत्ता, स्वच्छता व आरोग्य‌विषयक तरतुदी याबाबत सविस्तर माहिती दिली.

यावेळी सुभाष टाकळे यांनी शिक्षण विभागाची भुमिका, शाळा प्राधिकरणाची भुमिका व जबाबदारी याविषयी मार्गदर्शन केले तसेच प्रफुल टोपले यांनी अन्न सुरक्षा व मानदे नियमनामधील तरतुदींबाबत मार्गदर्शन केले तसेच शाळांमध्ये वितरीत होणारा आहार कसा असावा, काय काळजी घ्यावी, याबाबत मुख्याध्यापकांना अवगत करून त्यांच्या शंकांचे निराकरण केले. सदर कार्यशाळा अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे याच्या सूचनेनुसार सह आयुक्त कृष्णा जयपुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली.





  Print






Related Photos