महत्वाच्या बातम्या

 स्मशानभूमीलाही चोरट्यांची नजर : सोलर पंपाचे २७ हजारांचे साहित्य लंपास


विदर्भ न्यूज एक्सप्रेस  
प्रतिनिधी / चंद्रपूर : ज्या स्मशानभूमीत माणसाच्या आयुष्याचा अखेरचा प्रवास पूर्ण होतो, त्या पवित्र जागेलाही चोरट्यांनी सोडले नाही. नागभीड तालुक्यातील काम्पा येथील स्मशानभूमी परिसरात ग्रामपंचायतीने उभारलेल्या सोलर ड्युअल पंपाचे वायर, लोखंडी अँगल आणि कंट्रोल पॅनल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत तब्बल २७ हजार रुपयांचे साहित्य लंपास झाले आहे.

काम्पा ग्रामपंचायतीमार्फत सुमारे तीन वर्षांपूर्वी स्मशानभूमी परिसरात सोलर ड्युअल पंप सर्व्हिस उभारण्यात आली होती. स्मशानभूमीत आवश्यक पाण्याची सुविधा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने ही व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, अज्ञात चोरट्यांनी या सुविधेवरच डल्ला मारत वायर, लोखंडी अँगल आणि कंट्रोल पॅनल कापून नेले.

१६ सप्टेंबरच्या रात्री ८ वाजेपासून १७ सप्टेंबरच्या सकाळी १० वाजेपर्यंतच्या कालावधीत ही चोरी झाल्याचा संशय आहे. १७ सप्टेंबर रोजी ग्रामपंचायतीचे चपराशी रोशन कुरुडकार हे मोटार पंप सुरू करण्यासाठी स्मशानभूमीत गेले असता सोलर पंपाचे साहित्य गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना याची माहिती दिली.

यानंतर सरपंच कातले, उपसरपंच देवाडे, ग्रामपंचायत सदस्य जगदिश मालोदे यांच्यासह इतरांनी घटनास्थळी पाहणी केली. त्यावेळी सोलर पंपासाठी लावण्यात आलेले वायर, लोखंडी अँगल आणि कंट्रोल पॅनल जागेवर नसल्याचे स्पष्ट झाले. चोरी झालेल्या साहित्यामध्ये सुमारे २ हजार रुपयांची वायर, १० हजार रुपयांचे लोखंडी अँगल आणि १५ हजार रुपयांचे कंट्रोल पॅनल असा एकूण २७ हजार रुपयांचा ऐवज असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या घटनेमुळे स्मशानभूमीसारख्या संवेदनशील आणि सार्वजनिक ठिकाणच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. ग्रामपंचायतीच्या सुविधेवर डल्ला मारणाऱ्या अज्ञात चोरट्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. याप्रकरणी ग्रामपंचायत सदस्य जगदिश राघो मालोदे यांनी नागभीड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केला असून पुढील तपास नागभिड पोलीस करीत आहे.





  Print






Related Photos