विश्वासाच्या नात्याला तडा : घरातील कपाटातून ९७ हजारांचा ऐवज गायब


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : नातेवाईक म्हणून घरात येणाऱ्या महिलेच्या भेटीनंतर घरातील कपाटातून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम गायब झाल्याची घटना राजुरा येथे घडली. या घटनेत सुमारे ९७ हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचे समोर आले असून, घरमालकाने नातेवाईक महिलेवर संशय व्यक्त केला आहे. अशोक बापुराव कोवे हे सेवानिवृत्त कर्मचारी असून राजुरा येथील पेठ वॉर्डात भाड्याच्या घरात राहतात. पत्नीचे २०२३ मध्ये निधन झाल्यानंतर मुलगी सुप्रिया हीच त्यांचा आधार होती. तिचे २०२६ मध्ये लग्न झाल्यानंतर ती अधूनमधून वडिलांकडे येत होती.
तिचे आणि आईचे काही सोन्याचे दागिने तसेच रोख रक्कम कोवे यांच्या घरातील कपाटात सुरक्षित ठेवण्यात आली होती. ९ सप्टेंबर रोजी सुप्रिया दागिने व रोख रक्कम असलेली पर्स कपाटात ठेवून सासरी गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी तिची मावशी कोवे यांच्या घरी आली. तिने स्वयंपाक केला आणि काही वेळ घरात थांबल्यानंतर निघून गेली. दरम्यान, ११ सप्टेंबर रोजी सकाळी कोवे यांच्या निदर्शनास कपाटाचा दरवाजा उघडा दिसला. कपाट तपासले असता पर्समधील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम गायब असल्याचे आढळले. मुलीला माहिती दिल्यानंतर चोरीचा प्रकार स्पष्ट झाला.
चोरीला गेलेल्या ऐवजात सोन्याचे झुमके, दोन डोरले व १७ मण्यांची माळ, पुरुषांची अंगठी, नथ आणि रोख रक्कम यांचा समावेश आहे. एकूण २९ ग्रॅम सोन्याचे दागिने व १० हजार रुपये रोख, असा सुमारे ९७ हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेले. नातेवाईक असल्याने कोवे यांनी काही दिवस तक्रार दाखल केली नाही. मात्र, अखेर २२ सप्टेंबर रोजी त्यांनी राजुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून नातेवाईक महिलेवर चोरीचा संशय व्यक्त केला. या घटनेमुळे घरात सुरक्षित ठेवलेल्यादागिन्यांबाबतचा विश्वासच प्रश्नचिन्हात आला असून, राजुरा पोलिसांकडून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.




Petrol Price




